

कोकरूड : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून बँकेत तारण ठेवत 'सखी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'च्या शेडगेवाडी (ता. शिराळा) शाखेकडून तब्बल ८ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संस्थेचे इंटरनल ऑडिट मॅनेजर घन:श्याम बाळासाहेब पाटील (वय ४७, रा. मलकापूर-कराड, ता. कराड) यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अश्विनी संजय माटेकर (रा. माटेकरवाडी, ता. कराड), सिंधू जयसिंग सूर्यवंशी (रा. शेवाळवाडी, ता. कराड) आणि सराफ कृष्णात वसंतराव पेठकर (रा. आरळा, ता. शिराळा) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी २०२५ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेडगेवाडी येथील सखी मल्टिस्टेट शाखेत चार वेगवेगळ्या कर्ज प्रकरणांत सोन्याचे दागिने तारण ठेवण्यात आले होते. यामध्ये ४४.९०० ग्रॅमची चैन, २२.३०० ग्रॅमचे नेकलेस, ३२ ग्रॅमची चैन, २०.८०० ग्रॅमची चैन आणि ३९.५०० ग्रॅमची बांगडी असे एकूण १५९.५०० ग्रॅम वजनाचे दागिने तारण म्हणून जमा केले गेले.
या दागिन्यांची मूल्यांकनासाठी तपासणी केली असता, संशयित सराफ कृष्णात पेठकर याने हे दागिने खरे सोने असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. त्यावर विश्वास ठेवून संस्थेने ८ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र, कर्जाची नियमित परतफेड न झाल्याने संस्थेने तारण दागिन्यांची पुनरतपासणी केली. त्या वेळी तारण ठेवलेले सर्व सोने बनावट असल्याचे उघडकीस आले. या फसवणुकीमुळे व्याजासह संस्थेचे एकूण ११ लाख ७०४ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.