

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 1 ते सव्वा कोटींचे कमिशन थकीत असल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून कमिशनचे अनुदान मिळत नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
वाळवा तालुक्यात एकूण 185 स्वस्त धान्य दुकाने आहेत. यामध्ये अनेक सहकारी संस्था आणि बचत गट यांचाही समावेश आहे, जे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, गेले सहा महिने कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. घरखर्च, कर्मचार्यांचे वेतन, दुकानाचे भाडे आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे. शासनाच्या धोरणात्मक बदलांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे दुकानदारांचे कमिशन अडकल्याचे बोलले जात आहे. ही योजना नेमकी कशी कारणीभूत ठरली, याचा खुलासा मात्र झालेला नाही. यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दुकानदारांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत, तसेच संघटनांच्यावतीने वारंवार भेटीगाठी घेऊन कमिशन लवकरात लवकर अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीही हाती लागत नसल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काम करणार्या कर्मचार्यांचे मनोधैर्य खचत असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने तोडगा काढून, दुकानदारांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.