

मिरज : अमेरिकेने भारतीय मालावरील निर्यात कर आता 25 टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने मिरज आणि कुपवाड येथील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे दीड हजाराहून अधिक कोटी रुपयांची निर्यात ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील उद्योजकांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने यावर त्वरित तोडगा काढण्याचीही मागणी उद्योजकांकडून होत आहे.
सांगली, मिरज व कुपवाड या ठिकाणी एकूण चार औद्योगिक वसाहती आहेत. यापैकी सांगली येथील वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीमधून कोणताही माल अमेरिकेमध्ये निर्यात केला जात नाही. मात्र मिरजेतील औद्योगिक वसाहत, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत आणि कुपवाड औद्योगिक वसाहत या तीन ठिकाणांहून अमेरिकेला अनेक प्रकारचा माल निर्यात केला जातो. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 350 उद्योग आहेत. त्यापैकी नऊ उद्योग अन्य देशांशी आयात- निर्यातीचे व्यवहार करतात. मिरजेतून अमेरिका, जर्मनी, युरोप, दुबई, सौदी अरेबिया, पेरू, नायजेरिया अशा अनेक राष्ट्रांमध्ये उत्पादने पाठवली जातात. त्यामध्ये स्पेशल पर्पज मशीन, स्टेपलॉन, हार्डनेस टेस्टिंग मशीन, फौंड्री साहित्य, कापड अशा अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. मिरजेच्या गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 60 उद्योग आहेत. येथे सहा कंपन्यांकडून उत्पादने आयात-निर्यात केली जातात.
कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 750 उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे 50 कारखान्यांमधून अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कापड, ऑटोमोबाईल पार्ट्स यांसह अनेक प्रकारचा माल आयात व निर्यात केला जातो. या तीनही औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्यक्ष अमेरिकेला माल पाठविणारे जितके उद्योजक आहेत, त्यापेक्षा अधिक उद्योजक हे अमेरिकेला अप्रत्यक्षरित्या माल पाठविणारे आहेत. एखादा कच्चा माल येथे तयार होतो आणि तो पक्का तयार करण्यासाठी अन्य ठिकाणी जातो आणि तेथून तो अमेरिकेला पाठविला जातो. या तीनही औद्योगिक वसाहतींमधून वर्षभरात सुमारे दीड हजारहून अधिक कोटी रुपयांचा माल निर्यात केला जातो. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल, असेही स्पष्ट केले आहे. 25 टक्के शुल्क आणि दंड लावण्याची घोषणा झाल्यानंतर केंद्र सरकारने या शुल्काच्या परिणामांचा अभ्यास सुरू केला आहे. अमेरिकेने जर हा कर लावलाच, तर सांगली जिल्ह्यातील मिरज व कुपवाड येथील उद्योजकांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. मिरज व कुपवाड येथील उद्योजकांकडून अमेरिकेला वर्षभरात थेट व अप्रत्यक्षरित्या होणारी सुमारे 1500 कोटी रुपयांच्या मालाची निर्यात ठप्प होण्याचा मोठा धोका आहे.
उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, सध्या अमेरिका ही भारतीय मालावर सुमारे 4 ते 6 टक्के कर आकारते. त्यामुळे काही प्रमाणात उद्योजकांना फायदा होतो. आता तब्बल 25 टक्के कर आकारला, तर अमेरिकेला माल पाठविणे तोट्याचे होणार आहे. सध्या अमेरिकेला माल पाठविल्यानंतर दोन ते तीन टक्के इतके उत्पन्न मिळते, पण 25 टक्के कर लावल्यास तोटा सहन करणे अशक्य आहे. त्यामुळे अमेरिकेला मालाची निर्यात करणे बंद करावे लागणार आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील उद्योगविश्वात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. केंद्र सरकार या पेचप्रसंगावर तातडीने काही उपाययोजना करेल का, याकडे औद्योगिक वसाहतींचे लक्ष लागलेले आहे.