Sangli encroachment issue: आयुक्तांची बदली अन्‌‍ रात्रीत अवतरली 12 खोकी

टेंडर मॅनेजर सुखावले : करबुडवे, अतिक्रमणात माहीर असलेल्यांनी सोडला सुटकेचा श्वास
Sangli encroachment issue: आयुक्तांची बदली अन्‌‍ रात्रीत अवतरली 12 खोकी
Published on
Updated on

सांगली : महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या बदलीचा आदेश गुरूवारी रात्री येऊन धडकला आणि लगेचच राजे मल्हारराव होळकर चौकात रात्रीत बारा खोकी अवतरली. गेल्याच महिन्यात अतिक्रमणविरोधी कारवाईअंतर्गत महापालिकेने हटवलेली खोकी पुन्हा आहे त्या जागेत उभी राहिली. आयुक्तांच्या बदलीने करबुडवे, अतिक्रमणात माहीर असलेल्यांनी सुटकेचा श्वास सोडला. टेंडर मॅनेजरही सुखावले आहेत. त्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात जोरात सुरू आहे.

आयुक्त सत्यम गांधी हे डायनेमिक कमिशनर आहेत. त्यांना मीच कडक शिस्तीने काम करण्यास सांगितले होते. महापालिका निवडणुकीनंतरही कडक शिस्त कायम ठेवण्यास सांगितले आहे. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. त्यामुळे ते आता आणखी एक वर्षभर तरी आयुक्त म्हणून राहणार, असे संकेत मिळत होते. मात्र त्यांच्या झालेल्या बदलीने चर्चेचे काहुर उठले आहे. शुक्रवारी अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या झालेल्या बदलीविषयी आश्चर्य व्यक्त केले.

आयुक्त गांधी यांची अवघ्या वर्षभरात झालेली बदली सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. गांधी यांनी कार्यकाळात महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर भर दिला. पारदर्शी निविदा प्रक्रियेमुळे सुमारे 14 कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा नुकतेच करण्यात आला होता. त्यावरून सर्वकाही स्पष्ट होते. मजूर सहकारी सोसायट्यांना होत असलेले काम वाटप, दोन लिफाफे पद्धतीच्या निविदांना चाप लावला होता. निविदांमध्ये स्पर्धात्मकता आणली होती. अनावश्यक कामे टाळली होती. त्यामुळे निविदा मॅनेजर अस्वस्थ होते.

मालमत्ता शोध मोहीम, थकबाकी वसुली, अतिक्रमणावरील कारवाई आणि विकास प्रकल्पांना गती देण्यात आयुक्त गांधींनी पुढाकार घेतला होता. याशिवाय नागरिकाभिमुख उपक्रमांतर्गत अनेक सेवा ऑनलाइन करण्यात आल्या, ड्रेनेज आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यात आली. त्यामुळे प्रशासनात गती आणि शिस्त आल्याचे चित्र दिसू लागले होते. मात्र या कडक धोरणांमुळे काही स्तरांवर नाराजी निर्माण झाल्याचीही चर्चा होती. एकीकडे त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे कौतुक होत असताना अचानक बदली झाली.

सत्यम गांधी यांच्या बदलीचा आदेश गुरूवारी रात्री येऊन धडकला, त्यासारशी काही शक्ती सक्रिय झाल्या. सूतगिरणी ते सांगली-मिरज रस्त्यावर राजे मल्हारराव होळकर चौकालगतच्या रस्त्यावर गुरूवारी रात्री 12 खोकी अवतरली. ही खोकी गेल्यामहिन्यात महापालिका प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत हटवली होती. मात्र आयुक्तांची बदली झाल्याचे समजताच ही खोकी पुन्हा उभारण्यात आली.

दरम्यान, अन्य एका रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावरून फ्रंटमार्जिनमधील पत्र्याचे शेड, खोकी संबंधितांनी काढून घेतली होती. आयुक्तांच्या बदलीनंतर त्यातील काहींनी ..ही अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्यात जरा घाईच केली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news