

आष्टा : आष्टा नगरपालिकेत 34 वर्षे शिपाई म्हणून प्रामाणिक सेवा बजावत आलेल्या चंद्रभागा भागोजी चोरमुले यांचा निवृत्तीनिमित्त झालेला सत्कार सर्वांनाच भावूक करून गेला. चंद्रभागा चोरमुले यांना काकी म्हणून ओळखले जाते. मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी चोरमुले काकींना स्वतःच्या खुर्चीत बसवून त्यांचा सन्मान केला.
काकींची आदर्श प्रवासगाथा अतिशय संघर्षातून उभी राहिलेली आहे. पतीच्या आजारपणामुळे घराची संपूर्ण जबाबदारी अचानक खांद्यावर आल्याने चोरमुले काकींनी अत्यंत कठीण स्थितीत नोकरी सांभाळली. दोन लहान मुलांना वाढवणे, शिक्षण देणे आणि सेवा बजावणे हे सर्व त्यांनी पार पाडले.
काकींनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. एक मुलगा तासगाव येथे पोलिस दलात सेवेत असून दुसरा मुलगा व्यवसायात यशस्वी झाला. गेल्या 34 वर्षांच्या वाटचालीत त्यांनी नगराध्यक्ष, प्रशासकापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा सन्मान राखत काम केले. नुकत्याच त्या निवृत्त झाल्या, मात्र ‘चोरमुले काकी’ ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहील, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
नगरपालिकेच्या 172 व्या वर्धापनदिनी त्यांचा सत्कार झाल्याने आष्टा नगरपालिकेच्या इतिहासातील अनोखा आणि मनाला भिडणारा हा क्षण पाहताना उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, तसेच अजित चोरमुले, गणेश चोरमुले आदी उपस्थित होते.