

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच पितृपक्ष सुरू होत असल्याने 'शुद्ध मुहूर्तावर' अर्ज दाखल करण्याकडे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा कल दिसून येत आहे. आगामी १ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि सर्वपक्षीय आघाड्यांच्या चर्चेचे सत्र अतिशय तीव्र झाले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक जरी थेट पक्षीय चिन्हावर लढवली जात नसली, तरीही या निवडणुकीत भाजपविरोधात सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे मोठे राजकीय समीकरण पुन्हा एकदा आकाराला येण्याची चिन्हे आहेत. सध्या जिल्हा बँकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनुसार महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) यावेळी जादा जागांची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सांगलीत आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी (माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आदी) जागावाटपाबाबत महत्त्वाची चर्चा केली. यात राष्ट्रवादीने ५ जागांची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांशी (आमदार सुहास बाबर, संचालक तानाजी पाटील) बैठक घेतली. गेल्या निवडणुकीत ३ जागा मागितल्या असताना २ मिळाल्या होत्या, त्यामुळे यावेळी किमान ४ जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आक्रमक आग्रह शिवसेनेने धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीत असलेले हे दोन्ही घटक पक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संचालक तानाजी पाटील यांनी दिलेल्या संकेतानुसार, शिवसेना (शिंदे गट) सोसायटी गट वगळता इतर सर्व गटांतून आपले अर्ज दाखल करणार आहे.
दुसऱ्या बाजूला, भारतीय जनता पक्षाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. भाजपने सर्वच्या सर्व जागांवर सक्षम व प्रभावशाली उमेदवार उभे करून 'स्वतंत्र पॅनेल' मैदानात उतरवण्याची तगडी रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेत्यांना त्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात सर्वच गटातून जास्तीत जास्त इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उमेदवारीसाठी काय आहेत नियम?
मतदार यादीत नाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. बँक/संस्थेचा थकबाकीदार नसावा. उमेदवार कोणत्याही सहकारी संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसणे बंधनकारक आहे. अनामत रक्कम -खुला गट २,०००, राखीव गट ५००/. सूचक व अनुमोदक : उमेदवारी अर्जावर संबंधित मतदारसंघातील एक सूचक आणि एक अनुमोदक यांची स्वाक्षरी आवश्यक आहे.