Sangli Fraud Case : सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने वृध्देस लाखाचा गंडा

आटपाडी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
fraud  case
fraud casepudhari photo
Published on: 
Updated on: 

आटपाडी : आटपाडीच्या आठवडा बाजारात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी ६२ वर्षीय वृद्ध महिलेची ९० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताबाई हिंदुराव लांडगे (रा. साठेनगर, आटपाडी) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वडार समाजाच्या स्मशानभूमी परिसरात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई लांडगे या आठवडा बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अंदाजे ३५ ते ४५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना स्वस्त दरात सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मण्यांची माळ आणि कानातील फुले काढून देण्यास सांगण्यात आले. भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लांडगे यांनी आपले दागिने काढून त्यांच्या हातात दिले. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्याकडील सोन्यासारखा दिसणारा पिवळ्या धातूचा एक बनावट तुकडा शांताबाई यांना दिला आणि त्यांच्या मौल्यवान दागिन्यांसह तेथून पसार झाले.

घरी गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात सुमारे ७५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याच्या मण्यांची माळ आणि १५ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची कानातील फुले, असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लांबवला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मचाले अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.