

सांगली : संरक्षण देण्यासह, चौकशीविना अधिकार्यांना अटक करू नये, या मागणीसाठी शुक्रवारपासून जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकार्यांनी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाचे काम शुक्रवारी ठप्प होते.
नागपूर प्रकरणानंतर राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी दबावात काम करीत आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारपासून अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्यांसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी सहभागी झाले आहेत. शिक्षण विभागातील अधिकार्यांनी आंदोलन सुरू केल्याने शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले.दरम्यान, नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहे.
प्रामाणिकपणे काम करणार्या अधिकार्यांना कायद्याने दिलेले संरक्षण नाकारून विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिकार्यांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागातील अधिकार्यांचे शासनाची परवानगी न घेता विनाचौकशी अटकसत्र सुरू असल्याच्या बाबीचा निषेध करण्यात आला. अतिरिक्त दूरदृश्यप्रणाली बैठका आणि सुटीच्या दिवशी अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याची मागणी करण्यात आली. शनिवार आणि रविवारी शासकीय सुटी राहणार आहे, त्यानंतर सोमवारी सरकारकडून निर्णय न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.