

सांगली : महापालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी पाचव्या दिवसअखेर एकूण ५,९०२ गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन झाले. एकूण १२ टन निर्माल्य जमा झाले आहे. याशिवाय महापालिकेच्या मूर्ती दान केंद्रात एकूण २२८ मूर्ती दान स्वरूपात जमा झाल्या.
पाचव्या दिवशी सांगलीतील प्रभाग समिती १ मध्ये २७९ व प्रभाग समिती २ मध्ये १,५४७ मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन झाले. कुपवाड प्रभाग समिती ३ मध्ये १,०५९, तर मिरजेत प्रभाग समिती ४ मध्ये २,५११ गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन झाले. महापालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी एकूण ५,३९६ मूर्तींचे विसर्जन झाले. दीड दिवसाच्या गणेशोत्सवात प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये ७४, क्रमांक २ मध्ये २३६, क्रमांक ३ मध्ये १९० आणि क्रमांक ४ मध्ये ६ अशा एकूण ५०६ मूर्तींचे विसर्जन झाले होते.
महापालिकेच्या नोंदीनुसार प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये ४२० मूर्ती विहिरीमध्ये, तर ६३९ मूर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित करण्यात आल्या. तसेच प्रभाग समिती ४ मध्ये २,४७७ मूर्ती तलावामध्ये आणि ३४ मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित झाल्याची नोंद आहे.
गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी एकूण ८.११ टन निर्माल्य संकलित झाले. दीड दिवसाच्या संकलनात जमा झालेल्या ४.०१९ टन निर्माल्यासह आतापर्यंत १२.१२९ टन निर्माल्य संकलित झाले आहे. प्रभाग समिती क्र. १ ते ४ च्या स्तरावर हे संकलन करण्यात आले. पाचव्या दिवसापर्यंत निर्माल्य संकलनाचा एकूण आकडा १२.१२९ टन झाला आहे. पाचव्या दिवशी १९७ मूर्तींचे दान झाले. पाच दिवसांत २२८ मूर्ती दान स्वरूपात जमा झाल्या आहेत.