

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना 15 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत. 22 ते 31 जुलै या कालावधीत हरकतींवर सुनावणी होणार आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध झाल्याने महापालिका निवडणुकीच्या हालचालींना गती आली आहे.
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी गुरुवारी राज्यातील महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. सांगलीतून आयुक्त सत्यम गांधी सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक आयुक्त नकुल जकाते उपस्थित होते. प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी प्रभाग रचनेसंदर्भात मार्गदर्शन केले
महापालिका निवडणुकीसाठी चारसदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना होणार आहे. प्रभाग रचनेबाबत नगरविकास विभागाने मार्गदर्शन सूचनांचा शासनआदेश 10 जूनरोजी काढला आहे. गुरुवारी (12 जून) प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिका आयुक्तांनी प्रगणक गटांची मांडणी 11 जून ते 16 जून या कालावधीत करायची आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या अनुषंगाने जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी 17 ते 18 जून या कालावधीत करायची आहे. स्थळ पाहणी 19 ते 23 जून, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे : 24 ते 26 जून, नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणी : 27 ते 30 जून, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षरी करणे : 1 ते 3 जुलै. ही सर्व कार्यवाही महापालिका आयुक्तांनी करायची आहे.
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत 4 जुलै ते 8 जुलै या कालावधीत राज्य निवडणूक आयोगास पाठवायचा आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती, सूचना मागवणे यासाठी 15 जुलै ते 21 जुलै हा कालावधी आहे. जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याने प्राप्त हरकतींवर 22 ते 31 जुलै या कालावधीत सुनावणी घ्यायची आहे. सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठविण्याचा कालावधी 1 ते 7 ऑगस्ट हा आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याची तारीख 22 ऑगस्ट ते 1सप्टेंबर 2025 ही आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
प्रगणक गटांची मांडणी : 11 जून ते 16 जून 2025
जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे : 17 ते 18 जून
गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार करणे : 24 ते 26 जून
नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जाऊन तपासण : 27 ते 30 जून
प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करणे : 1 ते 3 जुलै
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठवणे : 4 ते 8 जुलै
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी व हरकती मागवणे : 15 जुलै ते 21 जुलै
हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे : 22 जुलै ते 31 जुलै
अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेस पाठवणे : 1 ते 7 ऑगस्ट
अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे : 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर