

मिरज : मिरजेत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ‘एक बेस एक टॉप’लाच परवानगी आहे. याबाबत मंडळांसोबत आढावा बैठक घेतलेली आहे. डीजेबाबतीत जे मंडळ नियम तोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेली आवाजाची मर्यादा सर्व मंडळांवर बंधनकारक असेल. तसेच नशामुक्तीचे अभियान राबवणाऱ्या मंडळांचा मंत्र्यांच्या हस्ते गौरव केला जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी सांगितले.
शर्मा यांनी मिरजेमध्ये मंडळांच्या व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. डीजेच्या आवाजाची मर्यादा न्यायालयाने घालून दिलेली आहे. ती सर्व मंडळांनी पाळावीच, असे आवाहन त्यांनी केले. विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी ती वेळेत सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करतील, असेही ते म्हणाले. अनंत चतुर्दशीदिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी महिलांचे दागिने चोरीस जाण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती केल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाप्रसादासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्याची गरज नाही; परंतु या महाप्रसादामधून कोणालाही विषबाधा होणार नाही, याची जबाबदारी ज्या त्या मंडळाने घ्यायची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस पोलिस अधीक्षक तुषार दोशी, मिरज पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, कुपवाड एमआयडीसीचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजित तिप्पे, मिरज शहरचे सहायक निरीक्षक दत्तात्रय पुजारी आदी उपस्थित होते.
सोलापूरमध्ये डीजेला बंदी
सोलापूरमध्ये सर्वानुमते डीजेला बंदी घालण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे. असाच उपक्रम सर्वत्र राबवला जाणे गरजेचे असल्याचे रंजन शर्मा यांनी सांगितले.
गुन्हेगारांवर कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील गुन्हेगारांवर मोक्का आणि हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारे गणेशोत्सव काळामध्ये अनुचित प्रकार घडू नये, याची सर्वतोपरी काळजी घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.