Diwali Traditions : शेणाच्या गवळणींतून जपली जातेय संस्कृतीची नाळ!

दिवाळीत अंगणा-अंगणात अवतरले शेणाचे ‘गोकुळ’
Diwali Traditions : शेणाच्या गवळणींतून जपली जातेय संस्कृतीची नाळ!
Published on: 
Updated on: 

पारे : सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह असून रोषणाई आणि फटाक्यांच्या आवाजाने शहरे गजबजली आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही दिवाळी एका वेगळ्या आणि निसर्गरम्य पद्धतीने साजरी केली जात आहे. वसुबारस व धनत्रयोदशीपासून घरासमोरील अंगणात गाईच्या शेणापासून 'गवळणी' म्हणजेच हुबेहूब गोकुळ साकारण्याची पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली अनोखी परंपरा आजही जपली जात आहे.

या परंपरेत केवळ शेणाचा वापर करून कल्पकतेच्या जोरावर डोक्यावर दुधा-दह्याचे हंडे घेतलेल्या गवळणी, श्रीकृष्णाचा सखा पेंद्या, विहीर, पाणी भरणारी महिला, जात्यावर दळण दळणारी जनी आणि खाटेवर निवांत झोपलेला बळीराजा अशा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलाकृती साकारल्या जातात. या मूर्तींना पाना-फुलांनी आणि रांगोळीने सजवले जाते. त्यांची मनोभावे पूजा केली जाते.

दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा नसून तो कृषी संस्कृती आणि पशुधनाशी जोडलेला उत्सव आहे. द्वापारयुगातील श्रीकृष्णाची गोवर्धन लीला आणि शेतकरी राजा म्हणजेच 'बळीराजा' यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. "इडा-पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना करत दररोज सकाळी व संध्याकाळी या शेणापासून तयार केलेल्या गवळणींना नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.

बदलत्या काळात अंगण हरवत असून पशुधनही कमी होत आहे. त्यामुळे शेणापासून गोकुळ साकारण्याची ही पारंपरिक लोककला लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे. ही केवळ धार्मिक परंपरा नसून ग्रामीण संस्कृती, निसर्गाशी असलेले नाते आणि पूर्वजांच्या जीवनशैलीचा वारसा आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना अशा परंपरा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कारण अंगण हरवले तरी अंगणातील संस्कृती हरवता कामा नये!
- स्नेहल पाटील, नीता सुर्वे, पाडळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.