

सांगली : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या बाजारात खरेदीसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने चोरीचे प्रकार घडले. शहर पोलिस ठाण्याच्या आवारातच चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक हवालदिल झाले होते. दिवाळी खरेदीसाठी आणलेली मोठी रक्कम चोरीला गेल्याने त्या महिलांना रडू कोसळले.
सहकुटुंब दिवाळी खरेदीसाठी आलेल्या अनेकजणांचे पाकीट मारल्याच्या घटना घडल्या. अनेकांचे मोबाईल चोरीला गेले, एका महिलेचे गंठण चोरट्यांनी लंपास केले. दिवाळी बोनसची रक्कम घेऊन खरेदीस आलेल्या महिलेचे पंचवीस हजार रुपये अलगदपणे लांबवले गेले. एकाची महत्त्वाची कागदपत्रे असणारी बॅग चोरीला गेली. पाकिटात असलेले एटीएम कार्ड, लायसन्स चोरीला गेले आहे. चोरट्यांच्या उपद्रवाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही महिला लहान मुलांचा वापर करून चोरी करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका लहान मुलीला दुकानातून मोबाईल चोरताना पकडले, तसेच दोन बालगुन्हेगारांना रंगेहात पकडून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
दुकानात खरेदीच्या बहाण्याने पाळत ठेवून जवळ मोठी रक्कम असलेल्या व्यक्ती, महिला हेरून हातोहात त्यांची पर्स, पाकीट लांबवल्याच्या अनेक घटना बाजारात निदर्शनास आल्या. सणासुदीसाठी साठवून ठेवलेले पैसे, दागिने, मोबाईल चोरीस गेल्याने अनेकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र होते.