Sangli ST Buses: गणेशोत्सवासाठी सांगली विभागातून २८० जादा बसेस

९ पासून जादा बसेस; २७ सप्टेंबरअखेर सेवा
ST buses
ST busespudhari photo
Published on
Updated on

​सांगली : गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सांगली विभागाने २८० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस मुंबई, ठाणे आणि कोकण विभागासाठी धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान आणि परतीच्या प्रवासासाठी १९ ते २७ सप्टेंबरअखेर या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

सांगली विभागातून उपलब्ध करून दिलेल्या २८० बसेसपैकी मुंबई विभागासाठी १३७, तर ठाणे विभागासाठी १४३ बसेस पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये ५० 'राजमाता जिजाऊ' बसेस आणि २३० साध्या परिवर्तन बसेसचा समावेश आहे.

आगारनिहाय बसेसचे नियोजन

सांगली आगार २९, मिरज २८, विटा ३२, ईश्वरपूर ३२, तासगाव ३२, जत ३०, आटपाडी २५, कवठेमहांकाळ ३०, शिराळा २२ आणि पलूस आगारातून २० बसेस सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता

कोकणातील घाट रस्ते आणि वळणे विचारात घेऊन केवळ अनुभवी चालकांचीच या बसेसवर नियुक्ती केली जाणार आहे. सर्व चालक व वाहकांची 'अल्कोटेस्ट' उपकरणाद्वारे तपासणी केली जाईल. सर्व गाड्या तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत ठेवूनच मार्गस्थ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टोल खर्च कमी करण्यासाठी या बसेस जुन्या महामार्गाने पाठवण्यात येणार आहेत.

हे नियोजन विभाग नियंत्रक सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक सतीश पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, शीतल पाटील, स्थानक प्रमुख महेश आदींच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

२४ तास मार्ग तपासणी पथक

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ तास मार्ग तपासणी पथक (स्क्वॉड) तैनात असणार आहे. बसेसना इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून स्वारगेट, वल्लभनगर, तळेगाव आणि पनवेल आगारात इंधन भरण्याची सोय केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथे मुख्य दुरुस्ती पथक तैनात असेल. या सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news