

सांगली : सांगली जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावातील पाणी हिरवेगार आणि अस्वच्छ झाल्यामुळे सोमवारी (दि. १२) आयोजित करण्यात आलेल्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या महापालिकास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा लांबणीवर टाकण्याची वेळ आयोजकांवर आली. जलतरण तलावाची झालेली दुरवस्था पाहून उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
महापालिकास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा सोमवारी जिल्हा क्रीडा संकुलात नियोजित होती. त्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक क्रीडा संकुलात दाखल झाले होते. मात्र, जलतरण तलावातील पाण्याची स्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. तलावातील पाणी पूर्णपणे हिरवेगार झाले असून त्यावर कचरा तरंगत होता. अशा दूषित पाण्यात शालेय मुला-मुलींची स्पर्धा कशी घ्यायची, असा संतप्त सवाल पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. अखेर, सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ऐनवेळी स्पर्धा लांबणीवर टाकण्याची नामुष्की क्रीडा विभागावर ओढवली.
या प्रकाराबाबत नागरी जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे; मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. येथील पाण्याचा दर्जा शेरीनाल्याच्या पाण्यापेक्षाही खराब झाला आहे. क्रीडा संकुलातील स्वच्छतागृहे तुंबलेली असतात, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आणि एकूणच खेळ, खेळाडू व मैदानाकडे क्रीडा अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे.