

सांगली : बाहेरील जिल्ह्यातील अन्न व औषध विभागाच्या स्वतंत्र विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवस छापासत्र राबवून प्रतिबंधित असलेल्या 1 कोटी 23 लाख 85 हजार 640 रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला साठा जप्त केला. ही माहिती सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेऊन कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विशेष भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांनी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये 9 ते 12 जानेवारी या 3 दिवसात कारवाया केल्या. सांगली जिल्ह्याचे सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे व नि. सु. मसारे तसेच स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासमवेत प्रतिबंधित अन्न वाहतूकदार व विक्रेत्यांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला.
सांगलीतील मगरमच्छ कॉलनी येथे वाहनावर (क्र. एमएच 10 सीआर 6460) कारवाई करून 24 लाख 90 हजार 440 रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला, सहा लाखाचे वाहन, असा 30 लाख 90 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मिरज-म्हैसाळ रस्त्यावर एका वाहनावर (क्र. केए 13 सी 8074) कारवाई करून विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणारा 76 लाख 95 हजार 200 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला साठा सोळा लाखाचे वाहन, असा एकूण 92 लाख 95 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी खरेदीदार, वाहतूकदार, पुरवठादार, उत्पादक, अशा 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसात केलेल्या या कारवाईमध्ये 1 कोटी 23 लाख 85 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून 12 जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सहभाग घेतला.