

स्वप्निल पाटील
सांगली : सांगली जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ४८ खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तीन ते चार खुनांची वाढ झाली आहे. मात्र, कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या इतर जिल्ह्यांतील खुनांच्या प्रमाणाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील टोळीयुद्ध जवळपास शमले असून, बहुतांश घटना वैयक्तिक कारणांतून घडत असल्याचे चित्र आहे. ४८ पैकी सांगलीतील कृष्णाघाटावर झालेला एक खून वगळता उर्वरित ४७ खून हे वैयक्तिक वादातूनच झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे.
२०२६ चे वर्ष संपायला अजून चार महिने बाकी असतानाच जिल्ह्यात खुनांची घटनांची 'हाफ सेंच्युरी' होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असून, अनेक टोळ्यांचा बिमोड करण्यात आला आहे. परंतु, वैयक्तिक वाद, जमिनीचे भांडण, अनैतिक संबंध, खंडणी आणि पैशांचा तगादा यातून होणारे खून रोखण्यात यश आलेले नाही.
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक घटना
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात खुनाच्या सर्वाधिक घटनांची नोंद दिसून येते. मध्यंतरी सांगलीतील वेदांत बंडगर या १३ वर्षीय बालकाचे डोळ्यात गोळी झाडून खुनाचे प्रकरण गाजले. त्यानंतर मिरजेत महावितरण कर्मचाऱ्याचा झालेला खूनही वैयक्तिक वादातूनच होता. नुकताच कुपवाड येथे घडलेला केसरेकर दाम्पत्याचा दुहेरी खूनही याच वैयक्तिक संघर्षाची परिणती आहे. वर्षाच्या सुरुवातीला पूर्ववैमनस्यातून सुरू झालेली खुनांची मालिका रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले, तरी गुन्ह्यांचे सत्र थांबलेले नाही.
पोलिस कारवाई अन् प्रतिबंधात्मक पावले
गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अनेक टोळ्यांवर हद्दपारीची, तर काहींवर 'मकोका'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनअखेर सांगलीत तीन, तर पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीणमध्ये प्रत्येकी दहा खून अधिक झाले आहेत.
कुपवाड येथील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संशयित फरीद शेख याला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. मात्र, संशयिताच्या दहशतीविरोधात नागरिकांनी आधीच पोलिस ठाण्यात तक्रार केली असती, तर केसरेकर दाम्पत्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चाही रंगत आहे. संशयित फरीद शेख हा अत्यंत क्रूर प्रवृत्तीचा असून, त्याने यापूर्वी स्वतःच्या मुलावरही चाकूने हल्ला केला होता, अशी माहिती समोर येत आहे.
जनजागृती आणि सामाजिक संयमाची गरज
खून झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करणे आणि न्यायालयात खटला चालवणे, हे काम पोलिस करतीलच; मात्र अशा घटना रोखण्यासाठी समाजाने व शेजाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. किरकोळ कारणावरून थेट जिवावर उठण्याच्या प्रवृत्तीमुळे सामाजिक संयम ढासळत चालल्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे चित्र विचार करायला लावणारे आहे.
इतकी क्रुरता येते कोठून?
किरकोळ वाद झाला तर पोलिस ठाणे आहे, तेथे नाही मिटले तर न्यायालय आहे. पण आता हा संयम राहिला आहे की नाही? हा प्रश्नच उरतो. कारण, ज्याला-त्याला आता आपल्यालाच न्याय देऊन मोकळे व्हायचे आहे. नडला की तोडला, ही भावना आता वाढीस लागली आहे. किरकोळ वादातून जर मुदडे पाडण्यापर्यंतची मजल जाऊ लागली तर समाजव्यवस्थेने विचार करण्याची गरज आहे.
सांगलीतील टोळ्या संपल्या?
पोलिसांच्या दाव्यानुसार सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा पूर्णपणे सफाया झाला असून, अवघे १० टक्के गुन्हेगार टोळ्यांशी निगडित आहेत. त्यांच्यावरही मोक्का व हद्दपारीसारख्या कठोर कारवाया केल्याने त्यांनी गुन्हेगारीपासून फारकत घेतली आहे. मात्र, गँगवार शमले तरी वैयक्तिक हिंसेचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.