

सांगली : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत सांगली जिल्ह्याने 2025-26 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत 176 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्हा राज्यात प्रथम आला आहे.
याबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी म्हणाल्या की, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत 1375 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून, युवक-युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकांच्या सहकार्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे तरुणांनी उद्योग-व्यवसाय उभारण्याकडे मोठ्या प्रमाणावर वाटचाल केली आहे. सर्वात जास्त 343 कर्ज प्रकरणे बँक ऑफ इंडियाने मंजूर केली तर त्याखालोखाल बँक ऑफ महाराष्ट्र 185, स्टेट बँक ऑफ इंडिया 162, युनियन बँक ऑफ इंडिया 149 व बँक ऑफ बडोदाने 124 प्रकरणे मंजूर केली.