

सांगली : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे खरीप पेरणी आणि मशागतीला अडथळा येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत.
मेच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले यांना पूर आले. नदीच्या पातळीत वाढ झाली. या पावसाचे पाणी शेतात साठून आहे. या पावसाचा फटका उन्हाळी पिकांना बसलेला आहे. आठ दिवसांपूर्वी पावसाने उघडिप दिली होती. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी दुपारी सांगली शहरात पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत तुरळक पाऊस सुरू होता.
सांगलीशिवाय शिराळा, कडेगाव, पलूस, मिरज, तासगाव, वाळवा या तालुक्यांच्या बहुतेक भागात पाऊस झाला. मिरज पूर्व भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर तासगाव पूर्व भागातील आरवडे, मांजर्डे, बलगवडे, बस्तवडे, पेड, हातनूर, कौलगे, डोर्ली, मोराळे परिसरात दुपारपासून संततधार पाऊस सुरू होता. त्याशिवाय वाळवा, म्हैसाळ परिसरात रिमझिम पाऊस झाला. शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाची नोेंद झाली. सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू आहे. अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत. जमिनीत पाणी साचून असल्याने मशागती व पेरणीस अडथळा येत आहे. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.