

सांगली ः देशात आणि राज्यात एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, या उद्देशाने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. मात्र आजही जिल्ह्यात हजारो लोक निरक्षर असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. यंदाही सुमारे 16 हजार 664 लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे. डिजिटलच्या युगातही हजारो लोक निरक्षर राहत असल्याने यंत्रणेच्या कारभारावर आणि लोकांच्या मानसिकतेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
1966 साली युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून जाहीर केला. जगभरातील निरक्षरता दूर करणे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, हा हेतू यामागील होता. मात्र डिजिटल युगात साक्षरतेला नवा अर्थ मिळाला आहे. केवळ वाचता-लिहिता येणे पुरेसे नाही, तर डिजिटल व्यवहार, तंत्रज्ञानाची जाण, माहितीचा सुजाण वापर या बाबीही आवश्यक झाल्या आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. त्यापैकी 58.64 कोटी स्त्रिया होत्या. परंतु साक्षर स्त्रियांची संख्या केवळ 39.6 कोटी इतकी नोंदली गेली. म्हणजेच स्त्री साक्षरतेचे प्रमाण 65.46 टक्के होते, तर पुरुष साक्षरतेचे प्रमाण 82.14 टक्के होते. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, स्त्रिया अजूनही साक्षरतेत मागे आहेत. याच जनगणनेनुसार देशभरात सुमारे 24 कोटी 82 लाख असाक्षर होते. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी आहे. त्यातील स्त्रिया 5.4 कोटी होत्या. त्यापैकी साक्षर स्त्रियांची संख्या 3.5 कोटी एवढी होती. स्त्री साक्षरतेचे प्रमाण 75.87 टक्के आहे. त्यानंतर साक्षर भारत व पढना लिखना योजनेअंतर्गत काहीजण साक्षर झाले. मात्र आजही देशभरात सुमारे 18 कोटी निरक्षर असल्याची शक्यता आहे. 2011 नंतर जनगणना झालेली नाही आणि सद्यस्थितीत अचूक आकडेवारी उपलब्ध नाही, असे जाणकारांनी सांगितले. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पंधरा वर्षांवरील 53 लाख पुरुष असाक्षर तर त्यापेक्षा दुपटीहून अधिक म्हणजे 1 कोटी 10 लाख स्त्रिया असाक्षर होत्या.
कोणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासनाकडून उल्हास नव भारत साक्षरता अभियान काही वर्षांपासून सुरू केले आहे. या अभियानअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी निरक्षरांची परीक्षा घेण्यात येते. मात्र प्रगत असलेल्या सांगली जिल्ह्यात आजही निरक्षर लोक आहेत हे आश्चर्य आहे. यावर्षी 16 हजार 864 जणांना साक्षर करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यात यापेक्षा देखील निरक्षरांची संख्या जास्त असल्याची शक्यता आहे. 2023-24 मध्ये जिल्ह्यात 12 हजार 679 जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्यातील 7 हजार 482 जणांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील सर्वंच परीक्षार्थी उत्तीर्ण झाली. 2024-25 मध्ये 15 हजार 895 निरक्षरांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्षात 16 हजार 558 जणांनी नोेंदणी केली. परीक्षेमध्ये 16 हजार 558 उमेदवार उत्तीर्ण झाले. 2025-25 म्हणजेच यावर्षीसाठी 16 हजार 864 निरक्षरांची यादी प्रशासनाकडे आली आहे. त्यातील 14 हजार 242 जणांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. या उमेदवारांची दि. 21 सप्टेंबर रोजी पहिली परीक्षा होणार आहे. गेल्या तीन वर्षाची आकडेवारी लक्षात घेतल्यास किमान 12 ते 16 हजार निरक्षरांची नव्याने भर पडत आहे.
जिल्ह्यात असे एकही गाव नाही जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना मोफ त शिक्षण दिले जात आहे. मात्र विज्ञान आणि डिजिटलच्या मोठमोठ्या बाता सुरू असल्या तरीही जिल्ह्यात आजही हजारोजण निरक्षर आहेत. आजही अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक लिहिता आणि वाचता येत नाही. ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षार्ंपासून जिल्ह्यात मॉडेल स्कूल ही चळवळ राबविली जात आहे.