

दिलीप जाधव
कवठेमहांकाळ : लक्ष्मी मुक्ती योजनेची अंमलबजावणी करताना जिल्ह्यात 16 मार्चअखेर तब्बल 15 हजार 892 महिलांची नावे सात/बारा उताऱ्यावर नोंदवली गेली आहेत. पाच उपविभागांतील 12 तहसील कार्यालयांमधून योजना राबवली. कवठेमहांकाळ तालुक्यातून 3005 नोंदी झाल्या आहेत. हा तालुका नंबर वन ठरला.
कविता दाभाडे यांच्याकडून 329 नोंदी
कवठेमहांकाळ तालुक्यात ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेच्या अंमलबजावणीत मळणगावच्या ग्राम महसूल अधिकारी कविता दाभाडे यांनी विशेष ठसा उमटवला. त्यांनी तब्बल 329 सात/बारा उताऱ्यांवर महिलांची नावे नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेच्या माध्यमातून महिलांना शेतीच्या मालमत्तेत हक्क देण्याचा उपक्रम राबवला जात आहे.
परंपरेने शेतीच्या सर्व कामांत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. ही दरी भरून काढण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.
या योजनेत शेतकऱ्यांनी सात/बारा उताऱ्यावर पत्नीचे नाव सहमालक म्हणून नोंदवण्याची तरतूद आहे. यामुळे महिलांना केवळ कायदेशीर हक्कच नव्हे, तर सामाजिक सन्मान आणि आर्थिक बळही मिळते, असे शासनाचे म्हणणे आहे.
महिलांच्या नावावर जमीन नोंदवल्यामुळे त्यांना बँक कर्ज, विविध शासकीय योजना आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुलभता निर्माण झाली.