Sangli News : सांगली जिल्हा कारागृह स्थलांतर कागदावरच

नवीन कारागृहाला मंजुरी कधी?
Jail
JailPudhari
Published on
Updated on

सांगली : राजवाडा परिसरातील सांगली जिल्हा कारागृह नागरी वस्तीपासून दूर शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मिरज तालुक्यातील सावळी येथे नवीन कारागृहासाठी जागेची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर केला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर सावळी येथील जागा ताब्यात घेऊन नवीन कारागृह उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही माहिती कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून प्राप्त झाली.

राजवाडा परिसरातील जिल्हा कारागृह भर नागरी वस्तीत आहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना कारागृहाचा त्रास होतो आहे. त्यामुळे कारागृह स्थलांतरित करण्याची मागणी भाजप नेते श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

सांगली जिल्हा कारागृहाची इमारत जुनी असून, यापूर्वी तीन वेळा कारागृह परिसरात महापुराचे पाणी शिरले आहे. कोरोना काळात बंदींना पटवर्धन हायस्कूलमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी लागली होती. तसेच कारागृहाच्या तटाची उंची कमी असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. सावळी येथील जागेचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाल्यानंतर ती जागा ताब्यात घेऊन नवीन कारागृह बांधण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन कारागृह स्थलांतराचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news