

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात शुक्रवारी दुपारपासून दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. शनिवारीही दिवसभर पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कडधान्य या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा मेपासूनच सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. गेले आठ-दहा दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे दिलासा मिळाला होता. शेतकरी शेतीतील कामे करीत होते. मात्र शुक्रवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी-पाणीच झाले होते. हवेत गारवा होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. उद्याही पाऊस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, या पावसामुळे काढणीला आलेला सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. या पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्याशिवाय सध्या द्राक्षपीक छाटणीचा हंगाम सुरू आहे. त्याच्यावरही पावसाचा परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ पर्यंत 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 0.3 (395.8), जत 2 (517.9), खानापूर 2.3 (434.5), वाळवा 0.1 (516.3), तासगाव 0.9 (464.9), शिराळा 0.5 (1210.7), आटपाडी 1.8 (505.9), कवठेमहांकाळ 0.6 (465.3), पलूस 0.0 (456.9), कडेगाव 0.1 (408.6).