

सांगली : पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघातील सांगली जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पदवीधर मतदार संघामध्ये 66 हजार 825, तर शिक्षक विधानपरिषद मतदार संघात 5 हजार 889 मतदार आहेत. यावर हरकती आणि दावे करण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता 18 डिसेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी करता येणार आहे. यासाठी निवडणूक अधिकारी मतदान केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेत थांबणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, सर्व विधानसभा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे गुरुवारी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी दिली.
1 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. 6 नोव्हेंबरअखेर प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरुन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी निश्चित करण्यात येणार आहे.
आता दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 18 डिसेंबर असा असून, या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये संबंधित मतदान केंद्रावर कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारण्याच्या आहेत. आता 18 डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठी मुदत असून, या दरम्यान संबंधित मतदान केंद्रामध्ये उपस्थित राहून मतदान अधिकारी मतदार नोंदणी करणार आहेत.