

अंजर अथणीकर
सांगली : सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2025-26 च्या आर्थिक वर्षात 609 कोटी 29 लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 171 कोटी 50 लाखांचा महसूल जास्त मिळाला. उद्दिष्टाच्या 39 टक्के अधिक असा हा महसूल आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर जिल्ह्याभरात करण्यात आलेली प्रभावी कारवाईमुळे महसूल वाढ झाली. गतवर्षात देशी दारू सर्वाधिक म्हणजे 78 लाख 97 हजार लिटर खपली.
यावर्षी अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर जिल्हाभरात अधिक प्रभावी कारवाई करण्यात आली. सुमारे दीड हजार जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हाभरातील कारवायांमध्ये सुमारे एक कोटीहून अधिक लिटर अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. भरारी पथकांद्वारे राबवलेली विशेष मोहीम आणि मद्यनिर्मिती घटकांवर प्रभावी पर्यवेक्षण यामुळे महसुली उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली. त्याचबरोबर जिल्ह्यात महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखालील मद्यनिर्मिती कारखानेही उपयुक्त ठरले आहे.