Sangli District Bank: सांगली जिल्हा सहकारी बँक नोकरभरतीला अखेर स्थगिती

आ. जयंत पाटील गटाला धक्का : निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सहकार विभागाचा निर्णय
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या बहुचर्चित नोकरभरती प्रक्रियेला अखेर राज्य शासनाच्या सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही भरती थांबवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, हा आदेश म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील गटाला धक्का मानला जात आहे.

या भरतीसाठी २४ जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आयबीपीएस कंपनीमार्फत सुरू असलेल्या या प्रक्रियेला उमेदवारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. १ जुलैअखेर बँकेकडे एकूण १४ हजार १५७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५ हजार जणांनी परीक्षा शुल्कासह अर्ज पूर्ण केले होते, तर ९ हजार १५७ उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांभावी अपूर्ण होते. ८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याने त्रुटी सुधारून कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी उमेदवारांकडे होती. मात्र, अंतिम मुदतीपूर्वीच भरतीला स्थगिती मिळाली आहे.

दरम्यान, सहकार आयुक्त व निबंधक यांच्या पत्राचा संदर्भ देत सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर विष्णू अमृते यांनी नोकरभरती स्थगितीचे आदेश गुरुवारी जारी केले. आदेशात नमूद केल्यानुसार, १ जुलैपासून जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आली असून, निवडणूक सुरू असताना अशा परिस्थितीत नवीन सेवक भरती करणे कायदेशीर व नैतिकदृष्ट्या उचित ठरणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही ४४४ कनिष्ठ लिपिक पदांची भरती स्थगित ठेवण्यात येत आहे.

जिल्हा बँकेत आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. नोकरभरतीला स्थगिती म्हणजे जयंत पाटील गटाला धक्का मानला जात आहे. स्थगिती आदेशामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. आ. जयंत पाटील विरुद्ध आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर अशी वादाची किनार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news