

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी आता ऐन मोक्यावर बिनविरोधच्या दिशेने झुकताना दिसत आहे. जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी सावट आणि बँकेची भक्कम आर्थिक घडी लक्षात घेता, निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय खलबते सुरू झाली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आघाडीचे नेते जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यातील चर्चेतून अंतिम तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात 'महायुती' म्हणून मैदानात उतरण्यावर प्राथमिक चर्चा झाली असली, तरी सध्याच्या दुष्काळी स्थितीत बँकेच्या हितासाठी टोकाचा संघर्ष टाळावा, असा सूर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावून धरला. प्रत्येकाच्या राजकीय ताकदीनुसार सन्मानजनक जागावाटप करून निवडणूक बिनविरोध पार पाडावी, असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गोटातही सांगलीत जोरदार राजकीय हालचाली झाल्या. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. निवडणूक ताकदीने लढण्याची तयारी ठेवतानाच, सन्मानपूर्वक प्रस्ताव समोर आल्यास बिनविरोधसाठी सकारात्मक चर्चा करण्याची भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही बाजूंच्या या संवादातून जागावाटपाचा सन्मानजनक फॉर्म्युला तयार होऊन ही बँक निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.