Sangli News : जिल्हा बँकेच्या शताब्दी वर्षात विविध उपक्रम

अध्यक्ष मानसिंगराव नाईक ः ठेवी, कर्जवाटप, उलाढालीत विक्रमी वाढ
Sangli District Central Bank
Sangli District Central BankFile Photo
Published on
Updated on

सांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात येत्या शनिवारपासून होणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, आर्थिक आणि सहकारविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत बँकेच्या ठेवी, कर्जे आणि उलाढाल, यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 1927 साली सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या या बँकेने 99 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. स्वातंत्र्यानंतर या संस्थेचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झाले. सहकारमहर्षी गुलाबराव पाटील, वसंतदादा पाटील, बाजीराव पाटील, राजारामबापू पाटील, यासारख्या दिग्गज नेतृत्वाने बँकेला भक्कम दिशा दिली. शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची बँक, अशी या बँकेची ओळख आहे. शासनाच्या विविध योजना या बँकेमार्फत राबवण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना या बँकेमुळे मिळाली. विविध राजकीय पक्षातील नेते राजकारण बाजूला ठेवून बँकेचा कारभार पाहतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बँकेची प्रगती झाली आहे.

गेल्या 25 वर्षांत एकही नवीन शाखा सुरू न झालेल्या बँकेला आता नवसंजीवनी मिळाली आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या काळात 10 नवीन शाखांना मंजुरी मिळाली. आणखी 10 शाखांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. पाच वर्षांपूर्वी 11,890 कोटी असलेली उलाढाल आता 17,237 कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच बँकेच्या उलाढालीत तब्बल 5,300 कोटींहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. बँकेने नेहमीच शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले आहे. कोणत्याही राजकीय विचारसरणीपासून दूर राहून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले आहे, ही या संस्थेची खास वैशिष्ट्ये आहेत. मार्चअखेर बँकेच्या ठेवी 10 हजार कोटी, कर्जवाटप 8 हजार कोटी आणि एकूण उलाढाल 18 हजार कोटींच्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न आहे.

सहकाराच्या बळावर उभ्या राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भक्कम आर्थिक वाटचाल करत शतकाच्या उंबरठ्यावर नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत ही बँक आगामी काळातही प्रगतीची नवी उंची गाठेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news