Sangli News : जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत

115 रुपयांनी दर वाढले; हॉटेल्स, खाद्यपदार्थ व्यवसायावर आखाती युद्धाचा परिणाम
Gas Cylinder
जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीतPudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता एलपीजी गॅस पुरवठ्यावर होताना दिसत आहे. दरम्यान, घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी काही कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद केला आहे, तर काही कंपन्यांनी मर्यादित पुरवठा करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग, खाद्यपदार्थ व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. याशिवाय काही उद्योगांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे. याशिवाय घरगुती सिलिंडरचे बुकिंग आता 21 दिवसाऐवजी 30 दिवसांनी घेण्याचा निर्णय गॅस वितरक कंपन्यांनी घेतला आहे.

भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे. सध्याच्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी शासनाने व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रशासनाकडून जिल्ह्यातील गॅस एजन्सीना आदेश देण्यात आले आहेत. काही एजन्सीज्‌‍नी दोन दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला असून, काही कंपन्यांनी पुरवठा मर्यादित ठेवला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यवसायावर होत आहे. हॉटेल असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

याबरोबरच गॅस सिलिंडरच्या दरातही रविवारपासून वाढ करण्यात आली आहे. घरगुती (14 किलो) सिलिंडरचा दर आता 856 वरून 916 रुपये करण्यात आला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर (19 किलो) 1801 रुपयांवरून 1916 रुपये करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडर आता पहिल्या सिलिंडर वितरणानंतर 21 ऐवजी 30 दिवसांनी देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दोन गॅस कनेक्शन्स्‌‍ आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय असून एक गॅस सिलिंडर असणाऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणे 21 दिवसांनी सिलिंडर मिळणार आहे.

जिल्ह्यातील गॅस वितरण, एक नजर...

घरगुती गॅस कनेक्शन्स : 8,11,537

व्यावसायिक कनेक्शन्स : 4 ते 5 लाख

एकूण कुटुंबांची संख्या : 7 लाख 66 हजार 138

गॅस वितरण एजन्सी : 90

शाळा, हॉस्पिटलची माहिती मागवली

शाळा आणि हॉस्पिटलसाठी महिन्याला किती व्यावसायिक सिलिंडर लागतात, याची माहिती सर्व गॅस एजन्सीकडून मागवण्यात आली आहे. विशेषत: फेब्रुवारी 2026 महिन्यामध्ये किती व्यावसायिक गॅसचे वितरण शाळा आणि हॉस्पिटलसाठी करण्यात आले, याची ग्राहकानिहाय आकडेवारी देण्याची सूचना गॅस एजन्सीज्‌‍ना देण्यात आली आहे.

गॅस कंपन्यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांपासून आम्ही व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. आजपासून सिलिंडरचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता दोन कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना तीस दिवसांनी घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे.
- गॅस वितरण कंपनीचे व्यवस्थापक, सांगली
दोन दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सिलिंडरचा पुरेसा पुरवठा झाला नाही, तर व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत शासनानेच उपाययोजना कराव्यात. याबाबत आम्ही हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेणार आहोत.
- रमेश शेट्टी, पदाधिकारी, हॉटेल असोसिएशन, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news