Sangli District Bank Election : मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर निवडणूक बिनविरोध

​आ. जयंत पाटील, सम्राट महाडिक; दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक टाळण्याचा प्रयत्न
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on: 
Updated on: 

​सांगली : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण न आणण्याची भूमिका यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संमतीने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी स्वतः पुढाकार घेऊन विनंती केली होती, ज्यानुसार सर्व प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आमदार जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा बँक ही राज्यातील आघाडीच्या बँकांपैकी एक असून सहकारात पक्षीय राजकारण आणू नये, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा संवेदनशील काळात निवडणूक लादणे शेतकऱ्यांच्यादृष्टीने योग्य नव्हते. मुख्यमंत्र्यांचा बिनविरोध निवडणुकीसाठी थेट फोन आला होता, त्यानुसार संबंधित उमेदवारांना विनंती करून अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. या प्रक्रियेत सर्वांनाच संधी देणे शक्य झाले नाही याची खंत असली तरी, जिल्ह्याची बिकट परिस्थिती पाहता, बिनविरोध निवडीला प्राधान्य दिले गेले. आगामी काळात दुष्काळग्रस्त आणि सिंचनाचे पाणी नव्याने पोहोचलेल्या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक ताकद देण्यावर बँकेचा भर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी सांगितले की, भाजपची निवडणुकीची पूर्ण तयारी झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत निवडणूक बिनविरोध करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी विचारविनिमय करून जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली. सहकारात वाद नको, म्हणून अंतिम दिवशी सर्व नेत्यांनी एकमताने एकच पॅनेल उभे करून निवडणूक बिनविरोध केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, संजय बजाज, विराज नाईक आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news