Sangli District Bank Election : पडळकर, घोरपडे, संजय पाटील विजयी

तासगाव, कवठेमहांकाळला आ. रोहित पाटील यांना धक्का
Sangli District Bank Election : पडळकर, घोरपडे, संजय पाटील विजयी
Published on: 
Updated on: 

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ६ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. लक्षवेधी ठरलेल्या जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर, कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, तर तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय पाटील यांनी बाजी मारली. तासगाव सोसायटी गटात संजय पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा अवघ्या २ मतांनी पराभव करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला धक्का दिला. मिरज सोसायटी गटातून अण्णासाहेब कोरे, अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे कृष्णा कांबळे, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून संभाजी कचरे यांनी विजय नोंदवला.

मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजरात जोरदार जल्लोष केला. ​जिल्हा बँकेच्या २१ पैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ६ जागांसाठी रविवारी ९३.९१ टक्के (२,४४६ पैकी २,२९७) मतदान झाले. मंगळवारी सकाळी शेतकरी भवनात ८ टेबलांवर २५ कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणी पार पडली.

​जत सोसायटी गट : पडळकरांचा २० मतांनी विजय

संपूर्ण जिल्हा आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत सोसायटी गटात आमदार गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते घेत विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी विनोद पवार (३४ मते) यांचा २० मतांच्या फरकाने पराभव केला.

​कवठेमहांकाळ सोसायटी गट : अजितराव घोरपडे यांची बाजी

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी ३७ मते मिळवून निसटता विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी तानाजी पाटील यांना ३३ मते मिळाली. घोरपडे यांनी ४ मतांनी ही जागा खेचून आणली.

​तासगाव सोसायटी गट : संजय पाटील यांचा रोहित पाटलांना धक्का

या निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या लढतीत माजी खासदार संजय पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव केला. संजय पाटील यांना ४०, तर सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली. अवघ्या २ मतांच्या फरकाने झालेल्या या पराभवामुळे तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

​मिरज सोसायटी गट : अण्णासाहेब कोरे विजयी

मिरज सोसायटी गटात खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे यांनी ४७ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी अनिल शेगुणशे (१९ मते) यांचा २८ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.

अनुसूचित जाती गट : काँग्रेसचे कृष्णा कांबळे यांची बाजी

काँग्रेसचे कृष्णा धोंडी कांबळे यांनी १,९१४ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. विलास पांडुरंग बेले यांना १७६, तर बाबासाहेब मधाळे यांना ११२ मते मिळाली.

​विमुक्त जाती व भटक्या जमाती गट : संभाजी कचरे यांचा विजय

संभाजी बाबुराव कचरे यांनी १,९७४ मते मिळवत मोठा विजय नोंदवला. त्यांचे प्रतिस्पर्धी अमित शंकर पारेकर यांना १८९, तर शंकर माने यांना केवळ ४६ मते मिळाली आहेत.

निकालाआधीच जल्लोषाची तयारी

जत, तासगाव आणि कवठेमहांकाळमधील चुरस पाहता, सोमवारी रात्रीपासूनच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच शहरात डिजिटल फलक लावले होते, तसेच मिरवणुकीसाठी घोडे, वाद्ये, हार घालण्यासाठी क्रेन, तसेच गुलालाची उधळण करण्यासाठी जेसीबी, अशी जय्यत तयारी केली होती. मंगळवारी निकाल हाती येताच संजय पाटील, अजितराव घोरपडे आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत परिसर दणाणून सोडला. जिल्हा बँकेसमोरही जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.