Sangli DCC Bank : ​अध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

जिल्हाभरात उत्सुकता; १८ नोव्हेंबरपूर्वी होणार फैसला
Sangli DCC Bank
Sangli DCC Bank
Published on: 
Updated on: 

सांगली : ​सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत दिग्गजांनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बँकेच्या सर्वोच्च अशा अध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या मुसंडीमुळे संचालक मंडळातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरू झाली आहेत.

​नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालात २१ पैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ६ जागांच्या मतमोजणीत राजकीय दिग्गजांनी वर्चस्व राखले. विशेषतः तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांच्या गटाला दिलेला धक्का आणि जतमधून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय, यामुळे निकालाची मोठी चर्चा झाली. या निकालानंतर आता अध्यक्ष पदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अध्यक्षांची निवड करणे प्रशासकीयदृष्ट्या बंधनकारक असल्याने येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी नवीन अध्यक्षांची घोषणा होणार आहे. सध्या दिवाळीच्या सुटीमुळे अधिकृत प्रक्रियेत काहीशी विश्रांती दिसत असली, तरी पडद्यामागे इच्छुकांची मोर्चेबांधणी शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, बिनविरोध संचालक निवडीच्या वेळी सर्व पक्षांमध्ये केवळ जागावाटपापुरती तडजोड झाली होती; अध्यक्ष पदाबाबत त्यावेळी कोणतीही पूर्वचर्चा झालेली नव्हती. त्यामुळे या सर्वोच्च पदाबाबतचा निर्णय आता नव्यानेच होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्थानिक ताकद, दिग्गजांची प्रतिष्ठा आणि अंतर्गत शह-काटशहच्या राजकारणात सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

समीकरणे बदलली...

​अध्यक्ष पदाच्या शर्यतीत काँग्रेसचे महेंद्र लाड, आमदार विश्वजित कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देवराज पाटील यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. मात्र, संचालक मंडळातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवड सर्वसंमतीने होणार, की राजकीय संघर्षातून, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या सर्वपक्षीय समन्वयातून व एकमताने घेतला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. याउलट, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी अध्यक्ष निवडीत भाजपची भूमिका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची ठरेल, असा दावा केल्याने चुरस आणखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.