Sangli DCC Bank Election : प्रारूप मतदार यादीवर २७३ हरकती दाखल

सुनावणी कोल्हापुरात असल्याने सभासदांतून नाराजी; सांगलीतच सुनावणी घेण्याची मागणी
Sangli District Bank |
सांगली जिल्हा बँकpudhari File Photo
Published on
Updated on

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची मुदत संपली असून अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातून २७३ हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये थकीत शिक्षण निधीच्या १०३, अपुऱ्या शेअर्सच्या ६४, बँक थकबाकीच्या ५, तर अन्य विविध कारणांच्या १०१ हरकतींत नावातील दुरुस्तीच्या ३२ तक्रारींचा समावेश आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यालय सांगलीत असताना हरकतींच्या सुनावणीसाठी सभासदांना कोल्हापूरला धाव घ्यावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही सुनावणी सांगलीतच घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत विकास सेवा सोसायट्या, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था, कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी बँका व पतसंस्था तसेच विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. या यादीवर हरकती घेण्यासाठी शेवटच्या मुदतीपर्यंत संबंधित संस्थांनी आपापल्या आक्षेपांची नोंद केली.

​प्रारूप मतदार यादीतील पात्रता, थकबाकी, शेअर्सची पूर्तता तसेच नावातील चुका यावरून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याने आता या हरकतींच्या सुनावणीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या हरकतींची छाननी करून पात्र व अपात्र मतदार निश्चित केल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बँकेचे मुख्य निवडणूक कार्यालय सांगलीत असताना हरकतींची सुनावणी मात्र कोल्हापूर येथील सह. सहकार निबंधक यांच्याकडे ठेवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जत, आटपाडी यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील संस्थांचे प्रतिनिधी व सभासदांना नाहक कोल्हापूर गाठावे लागत आहे. या ये-जा प्रक्रियेत वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी सभासदांकडून होत आहेत.

​हरकतींचे स्वरूप...

​थकीत शिक्षण निधी : १०३

​अपुरे शेअर्स : ६४

​बँक थकबाकी : ५

​अन्य हरकती : १०१

​एकूण हरकती : २७३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news