Sangli District Bank Election : सहा जागांसाठी आज मतदान

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; २ हजार ४४६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Sangli District Bank Election
Sangli District Bankpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उर्वरित सहा जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडेल. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण २ हजार ४४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

​या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे विनोद पवार यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील असा पारंपरिक राजकीय संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासमोर टी. व्ही. पाटील यांचे आव्हान असून आमदार रोहित पाटील यांची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे.

मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे व भाजपचे अनिल शेगुणशे यांच्यात थेट लढत आहे. याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गात के. डी. कांबळे, बाबासाहेब मधाळे व विलास बेले, तर भटक्या जाती-जमाती प्रवर्गात संभाजी कचरे, शंकर माने व अमोल पारेकर यांच्यात चुरस आहे.

​निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. १२ केंद्रांवर प्रत्येकी पाच याप्रमाणे ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांची कसून तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी पहाटेपर्यंत उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी व सोशल मीडियाद्वारे छुप्या प्रचारावर भर दिला होता. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.