Sangli DCC Bank: निवडणुकीसाठी अवसायनातील २०० संस्था वगळल्या

प्रारूप मतदार यादी जाहीर; २,३७७ मतदारांचा समावेश; २७ पर्यंत हरकती नोंदवता येणार
Sangli DCC Bank
Sangli DCC Bank
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, थकबाकीदार आणि नियमात न बसणाऱ्या तब्बल २०० संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.

अवसायानात गेलेल्या, नोंदणी रद्द झालेल्या, शेअर्स अपूर्ण असलेल्या आणि बँकेची थकबाकी न भरलेल्या संस्थांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या संस्थांचा पत्ता कट झाल्यामुळे यंदा जिल्हा बँकेच्या मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. कोल्हापूर विभागाचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत २,३७७ मतदारांचा समावेश केला आहे.

​जिल्हा बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया या प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीने अधिकृतपणे सुरू झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक ७७५ मतदार विकास सेवा संस्थांचे आहेत. त्यापाठोपाठ नागरी बँका, पतसंस्था व नोकरांच्या सहकारी संस्थांचे ७३५ मतदार, दूध, पशुपैदास, कुक्कुटपालन व पाणीपुरवठा संस्थांचे ३३१ मतदार, ग्राहक, गृहनिर्माण व औद्योगिक मजूर संस्थांसह व्यक्तिगत ४४९ मतदार, तर कृषी पणन, खरेदी-विक्री संघ व साखर कारखाने गटातून ८७ मतदारांचा यादीत समावेश आहे. तालुकानिहाय विचार करता वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५७८ मतदार असून, त्यापाठोपाठ मिरज तालुक्यात ४३३ मतदार आहेत.

जिल्ह्यातील ज्या संस्था अवसायनात आहेत, ज्यांची नोंदणी रद्द झाली आहे अथवा ज्यांनी बँकेची थकबाकी वेळेत भरलेली नाही, अशा २०० संस्थांना मतदानाच्या अधिकारापासून दूर ठेवण्यात आल्याने सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रारूप मतदार यादीवर ज्या संस्थांना किंवा प्रतिनिधींना काही त्रुटी, नावाबाबत आक्षेप अथवा अन्य हरकती नोंदवायच्या असतील, त्यांच्यासाठी १८ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींसह जिल्हाभरातून जिल्हा बँकेवर संचालक पदासाठीच्या इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news