

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सहा लाख सभासदांची खाती गोठवली आहेत. खातेदारांना केवायसी करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. मात्र लाखो खातेदारांनी केवायसी केली नाही. त्यामुळे बँक प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, खातेदारांनी तातडीने बॅँकेशी संपर्क साधून केवायसी करावी, यासाठी सुटीदिवशीही शनिवार व रविवारी बॅँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे विविध प्रकारचे अनुदान, मदत जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असते. सध्या अतिवृष्टी, पीक विमा व अन्य प्रकारची मदत शासनाकडून जमा होत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची केवायसी नसल्याने त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात अडचणी येत आहेत.
जिल्हा बॅँकेने गेल्या काही दिवसांपासून खातेदारांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे आता बॅँकेने खातेदारांच्या मोबाईल नंबरवर मेसेज करून केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे 24 लाख खातेदारांना मेसेज पाठविले आहेत. शासन अनुदानास पात्र सहा लाख खातेदारांची बँक खाती केवायसीसाठी गोठवण्यात आली आहेत. या सर्व खातेदारांनी आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन बॅँकेशी संपर्क करावा आणि केवायसी करावी. त्यानंतर त्यांचे खाते पूर्ववत सुरू होईल. केवायसीसाठी सुटीदिवशीही शनिवार, दि. 22 व रविवार, दि. 23 रोजी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. तसेच अन्य दिवशी जिल्हा बँकेच्या शाखांमधील कॅशची वेळ दोन तासानी वाढवून 6 वाजेपर्यंत करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.