

सांगली ः बड्या नेत्यांशी संबंधित जिल्ह्यातील पाच सूतगिरण्यांकडे जिल्हा बॅँकेची तब्बल 134.42 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने दुसर्यांदा लिलाव काढला. मात्र अर्ज करण्याच्या मंगळवारअखेरच्या मुदतीत एकही निविदा दाखल झालेली नाही. याहीवेळी खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने जिल्हा बॅँकेसमोर या थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच संस्थांमध्ये स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी (तासगाव), खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स (विटा), शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी (इस्लामपूर), प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रिज (इस्लामपूर) व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स (आटपाडी) या पाच सूतगिरण्यांचा समावेश आहे. या संस्थांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी बॅँकेने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लिलाव काढला होता. त्यावेळीही लिलावास प्रतिसाद मिळाला नाही. पाचपैकी केवळ एका सूतगिरणीसाठी एकानेच निविदा भरली होती. त्यामुळे या पाचही सूतगिरण्यांचा लिलाव रद्द करण्यात आला होता.
जिल्हा बॅँकेने फेरलिलाव काढला. यासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2025 अखेर होती. या मुदतीत या पाच संस्थांसाठी एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे या संस्थांचा फेरलिलावही रद्द करण्यात आला आहे. यातील शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप इंडस्ट्रिज व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स या तीन सूतगिरण्या जिल्हा बॅँकेने पाच वर्षापूर्वी एनपीए कमी करण्यासाठी स्वत: खरेदी केल्या आहेत. पाच वर्षापूर्वीही या सूतगिरण्यांच्या लिलावास प्रतिसाद मिळाला नव्हता. आताही तीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक आता या संस्थांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी काय कारणार? कोणते धोरण राबवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.