

सांगली : जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सहा तालुक्यांचे ३० ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात येतील, पहिल्या टप्यात जाहीर झालेल्या दुष्काळी चार तालुक्यांतील शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
डॉ. घोष म्हणाले की, दुसर्या टप्प्यात जाहीर झालेल्या शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांतील पिकांचे पंचनामे सुरू असून ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अहवाल शासनाला पाठविण्यात येतील. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीप्रश्न गंभीर बनत असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याबाबतचे नियोजन सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांचा समावेश होता. त्यानंतर ट्रिगर-२ शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यात सर्वाधिक साडेसात लाख खातेधारक आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील सर्वेक्षणास विलंब होत आहे. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट संकलन करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनास ३० ऑक्टोबरपर्यंत सादर केला जाईल.
एल् निनोचा प्रभाव मोठा असल्याने पाणीप्रश्न गंभीर बनत असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेले पाणी अधिकाधिक टिकविण्याबाबत प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली जात असून त्याची सुरुवात लवकरच करण्यात येईल. पाण्याच्या नियोजनाबाबत पुढील महिन्यात सरपंच परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चारा बियाणांसाठी ६ कोटी
सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चार्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात चार कोटी रुपयांच्या बियाणांंचे वाटप करण्यात आले आहे. नव्याने चारा वाटप करण्यासाठी आणखी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. असे एकूण सहा कोटी देण्यात येणार आहेत. महाबीजकडून बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेतकर्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. घोष म्हणाले.