

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून जिल्ह्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बँकेच्या २१ संचालकपदांच्या निवडीसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंजूर केला असून, १ नोव्हेंबर रोजी मतदान तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक (कोल्हापूर) यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीस हिरवा कंदील दाखवला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
बँकेच्या एकूण २१ संचालकपदांपैकी प्राथमिक कृषी पत पुरवठा, विकास सेवा संस्था, संयुक्त शेती संस्था व धान्य बँका या तालुकानिहाय मतदारसंघातून १० जागांसाठी निवडणूक होईल. महिला प्रतिनिधी मतदारसंघासाठी २ जागा, तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग या प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
याशिवाय इतर शेती संस्था मतदारसंघातून २ जागा, नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघातून २ जागा आणि इतर सर्व सहकारी संस्था मतदारसंघातून २ जागांची निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आणि पॅनेल प्रमुखांनी आपापली मोर्चेबांधणी वेगाने सुरू केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे : २४ ते ३० सप्टेंबर
अर्जांची छाननी : १ ऑक्टोबर
वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी : ५ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेणे : ६ ते २० ऑक्टोबर
चिन्ह वाटप, अंतिम यादी प्रसिद्धी : २१ ऑक्टोबर
मतदानाची तारीख : १ नोव्हेंबर (सकाळी ८ ते सायंकाळी ५)
मतमोजणी व निकाल : ३ नोव्हेंबर