Sangli DCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम

आजपासून ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू; ​२२ नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on
Updated on

सांगली : सहकार क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर विभागाचे सहकार निबंधक महेश कदम यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाले असून, येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख गट, पक्ष सक्रीय झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

या आदेशानंतर बँकेच्या विविध मतदार गटांतील सभासदांचे ठराव गोळा करणे, मतदार यादी अद्ययावत करणे आणि विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याच्या कामाला वेग आला आहे. प्राथमिक सेवा सहकारी संस्था, मजूर संस्था, नागरी पतसंस्था तसेच अन्य पात्र सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड आणि त्यांचे ठराव घेण्यासाठी सहकार क्षेत्रात लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात आपलाच प्रतिनिधी कसा पात्र ठरेल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पडद्यामागून मोर्चेबांधणी केली जात आहे.

सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, साधारणपणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी ही पाच महिने आधी सुरू केली जाते. मात्र, यंदा ही प्रक्रिया तुलनेने कमी कालावधीत सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि निवडणुकीचा मुख्य कार्यक्रम शेवटच्या ४५ दिवसांत पार पडणार असला, तरी आजपासून सुरू झालेली ठराव आणि प्रतिनिधी निश्चितीची प्रक्रिया कायदेशीर व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता हाती असावी, यासाठी सर्वच प्रमुख नेते आग्रही असतात. आगामी निवडणुकीत उमेदवार देताना आपल्याला, आपल्याच समर्थकांना संधी कशी मिळेल, याकडे नेतेमंडळींचा कटाक्ष असतो. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news