

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीच्या दिवशी नाटकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह सहा प्रमुख उमेदवारांच्या अर्जांवर विविध कारणांवरून हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. जिल्हा सहकार उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी तब्बल आठ तास चाललेल्या या छाननी प्रक्रियेनंतर सर्व हरकतींवर सुनावणी पूर्ण केली असून, निर्णय मंगळवारी (ता. ६) जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मातब्बर नेत्यांचे अर्ज टिकणार की बाद होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
येत्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी विक्रमी ३५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील प्रस्थापित व मातब्बर उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेतल्या जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. सोमवारी झालेल्या छाननी प्रक्रियेच्यावेळी बँकेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर स्वतः समर्थकांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब दिवसभर बँकेत ठाण मांडून होते, तर इतर उमेदवारांनी त्यांचे समर्थक आणि वकिलांचे पॅनेल बँकेत पाठवले होते.
दिवसभरात कागदपत्रांची बारकाईने शहानिशा करण्यात आली, तसेच सहकार कायद्यातील नवीन नियम व तरतुदींवर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसहा वाजल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवला आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमधील उत्सुकता व ताणतणाव शिगेला पोहोचला आहे.
प्रशासनाचा आदेश झुगारून सभागृहात गर्दी
जिल्हा बँकेच्या अर्ज सुनावणीसाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन प्रशासनाने उमेदवार व त्याचे सूचक आणि अनुमोदक यांनीच सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन केले होते. मात्र काही उमेदवारांनी हे आदेश धाब्यावर बसवत कार्यकर्त्यांना घेऊन मोठी गर्दी केली होती. त्याबाबत आमदार सावंत यांनी हरकतही घेतली. त्यावर प्रशासनाने उमेदवार, सूचक व अनुमोदक वगळता इतरांनी बाहेर जावे, असे आवाहन केले. मात्र त्याला दाद दिली गेली नाही. त्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यामुळे बँकेच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
कोणाविरुद्ध कोणी हरकत घेतली?
खासदार विशाल पाटील : हरकत घेणारे – तानाजी पाटील (सलगरे)
आमदार गोपीचंद पडळकर : हरकत घेणारे – माजी आमदार विक्रम सावंत व सुजय शिंदे
आमदार सुरेश खाडे : हरकत घेणारे – अण्णासाहेब कोरे व मोहन वनखंडे
आमदार सत्यजित देशमुख : हरकत घेणारे – आप्पासाहेब पाटील (शिराळा)
पूजा विशाल पाटील : हरकत घेणारे – तानाजी पाटील (सलगरे)
अनिता सगरे : हरकत घेणारे – विक्रम कोळेकर