Sangli District Bank Election: आघाडीचे जागावाटप जवळपास निश्‍चित

शिराळा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळची उमेदवारी राष्ट्रवादी (श. प.)कडे; तर काँग्रेसला मिरज, जत, कडेगाव, पलूस
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on
Updated on

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी मोठा वेग घेतला आहे. बँकेवरील आपली सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विकास सोसायटी गटात शिराळा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळची उमेदवारी राष्ट्रवादी (श. प.)कडे, तर मिरज, जत, कडेगाव, पलूसमधील उमेदवारी काँग्रेसला मिळणार आहे.

आघाडीच्या जागा वाटपाबाबत रविवारी पार पडलेल्या प्राथमिक बैठकीनंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर पुन्हा एक महत्त्वाची बैठक पार पडली. ​या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत सेवा सोसायटी गटातील तालुक्यातील उमेदवारीवर सखोल चर्चा झाली. सेवा सोसायटी गटात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्या ठिकाणी प्राबल्य आहे त्या ठिकाणी त्या त्या पक्षाचे उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करण्यात आली उमेदवार कोण असावा याबाबत ही चाचपणी करण्यात आली.

जिल्ह्यातील वाळवा शिराळा तासगाव कवठेमंकाळ या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्राबल्य आहे त्यामुळे त्या ठिकाणी या पक्षाचे उमेदवार हे सेवा सोसायटी गटातून असणार आहेत. दुसऱ्या बाजूला : पलूस, कडेगाव, मिरज आणि जत तालुक्यात सेवा सोसायटी गटातून काँग्रेसचे उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. ​

खानापूर, आटपाडीत विद्यमानांना संधी

खानापूर व आटपाडी तालुक्यात स्थानिक परिस्थितीनुसार विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.पतसंस्था, प्रक्रिया उद्योग, महिला प्रतिनिधी, मजूर संस्था आणि मागासवर्गीय गटातील जागांबाबतही प्राथमिक चर्चा झाली असून, पुढील दोन दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर लगेचच अधिकृत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. ​जिल्हा बँकेसारख्या संस्थात्मक निवडणुकांमध्ये पक्षीय चिन्हापेक्षा तालुका पातळीवरील स्थानिक नेतृत्व, विविध सहकारी संस्थांवरील पकड आणि वैयक्तिक प्रभाव अधिक निर्णायक ठरतो. याच वास्तववादी भूमिकेतून ''ज्याची ज्या भागात ताकद, त्याला तिथे संधी'' हे धोरण आघाडीने स्वीकारले आहे. सत्ताधारी आघाडीने बैठकांचा धडाका लावला असून आगामी निवडणुकीसाठी रणनीती अधिक तीव्र केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news