

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तगडे पॅनेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांशी चर्चा करून पुढील अंतिम रणनीती निश्चित केली जाणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजपच्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, राहुल महाडिक, चिमण डांगे, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, अमरसिंह देशमुख, वैभव पाटील आणि भाजप नेते शेखर इनामदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि विविध मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली. पालकमंत्री पाटील यांनी, पक्षाने या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरावे, अशी भूमिका मांडली. विकास सेवा संस्था गटासह अन्य सर्व महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
महायुतीतील घटकपक्षांशी चर्चा करून निवडणुकीचे स्वरूप आणि जागावाटप निश्चित केले जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड व पॅनेलची अंतिम रचना केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे पॅनेल उभारणार, की महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरणार, याचा निर्णय चर्चेनंतरच होणार आहे. महायुतीतील नेत्यांशी स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील संवाद साधणार आहेत.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून अंतिम मतदार यादीत २ हजार ४४५ मतदारांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सत्ताकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.