Sangli News : जिल्हा बँकेत १५ जागा बिनविरोध

६ जागांसाठी १३ उमेदवार मैदानात; समविचारी सर्वपक्षीय एकत्र
Sangli District Bank Election
Sangli District Bankpudhari photo
Published on: 
Updated on: 

​सांगली : बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित अशा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काही अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत केलेल्या समन्वयामुळे २१ पैकी १५ जागा बुधवारी बिनविरोध निवडल्या गेल्या. या बिनविरोध निवडीमुळे मोठा पेच टळला. आता शिल्लक राहिलेल्या ६ जागांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेषतः जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज या विकास सोसायटी गटातील निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले.

सर्वपक्षीय तडजोडीनंतर आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, वैभव शिंदे, अमोल बाबर, पूजा विशाल पाटील, वर्षा विक्रम सावंत, अपर्णा संग्रामसिंह देशमुख आणि नितीन होनराव हे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

उर्वरित ६ जागांपैकी सोसायटी गटातील कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील, जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार, तासगाव मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील, मिरजेत अण्णासाहेब कोरे विरुद्ध अनिल शेगुणशे, तर भटक्या विमुक्त गटात संभाजी कचरे विरुद्ध अमित पारेकर यांच्यात; तर अनुसूचित जातीच्या जागेसाठी के. डी. कांबळे, बाबासाहेब मधाळे व विलास बेले यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

जिल्हा बँकेमध्ये गेल्यावेळी आमदार जयंत पाटील यांचे प्रभुत्व होते. यावेळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार निवडणूक लढत होणार, अशी चर्चा होती.

भारतीय जनता पार्टीने सर्व जागांवर जोरदार निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली होती. त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावरून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामध्ये त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे ही निवडणूक कशी होणार, याची उत्सुकता होती. एका बाजूला सर्वच नेत्यांनी निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू केली होती. मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. दुसऱ्या बाजूला पडद्याआडून बिनविरोधसाठी मोठ्या हालचाली सुरू होत्या. काही दिवसापूर्वी महायुतीची कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली, त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार जयंत पाटील व आमदार विश्वजित कदम यांच्यात बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे या बिनविरोध निवडणूक चर्चेसाठी पुढे होते. दोन दिवस चर्चा केल्यानंतर काही अपवाद वगळता इतर जागांवर समझोता झाला. त्यानुसार उमेदवार निश्चित करून बाकी उमेदवारांनी माघार घेतली. त्याप्रमाणे १५ ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले. बाकी ठिकाणी समझोता न झाल्याने निवडणूक लागलेली आहे. बँकेसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान आणि ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या सोसायटी गटात चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

घराणेशाही, भाऊबंदकीला प्राधान्य

जिल्हा बॅँकेच्या तिकीटवाटपात सर्वच पक्षांत घराणेशाही व भाऊबंदकीला प्राधान्य दिले आहे. आ. जयंत पाटील यांचे पुतणे देवराज पाटील, आ. विश्वजित कदम स्वत: तसेच त्यांचे भाऊजी महेंद्र लाड व मावसभाऊ आ. विक्रम सावंत यांंच्या पत्नी वर्षा सावंत, खा. विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक. आ. सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू सतीश देशमुख व चुलतबंधू संग्रामसिंह देशमुख यांच्या पत्नी अर्पणा देशमुख यांचा बिनविराेधमध्ये समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन व ‘रेणुका’ऐवजी ‘अपर्णा’

बिनविरोधच्या चर्चेत महिला गटातून एक जागा भाजपला फायनल झाली. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रचंड प्रयत्न करत, या जागेवर रेणुका सत्यजित देशमुख यांचे नाव फायनल केले, अशी चर्चा होती. या ठिकाणी अपर्णा संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र संग्रामसिंह देशमुख यांनी टोकाची भूमिका घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात धाव घेतली आणि फडणवीस यांनी भाजपसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना फोन करून, अपर्णा संग्रामसिंह देशमुख हे नाव संचालकपदी असलेच पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर क्षणात सूत्रे फिरली आणि रेणुका देशमुख यांच्याऐवजी अपर्णा संग्रामसिंह देशमुख हेच नाव फायनल झाले, अशी चर्चा रंगली होती.

दोन जागांसाठी संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार

जिल्हा बँकेत भटक्या विमुक्त आणि अनुसूचित जाती या दोन गटात एकापेक्षा जादा अर्ज राहिल्याने निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

निवडणूक चर्चेचे केंद्र... जि.प. अध्यक्ष यांचा बंगला

जिल्हा बँक निवडणूक हालचालीचे केंद्र गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा बंगला हे बनले होते. या ठिकाणीच विविध पक्षांचे नेते चर्चेसाठी येत होते. त्यातून मार्ग निघून १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र सहा जागांसाठी निवडणूक लागली आहे.

बिनविरोध उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात दिग्गज नेते व त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणूक झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news