

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 208 कोटी 88 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. जिल्हा बँकेत आल्यानंतर पाच वर्षांत एनपीए कमी करण्याचे टार्गेट ठेवले होते, ते चार वर्षांत पूर्ण केले आहे. आता नेट एनपीए शून्य टक्के झाला आहे. बँकेचे शताब्दी वर्ष सुरू झाले असून शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासावर 10 हजार कोटींवर ठेवी करण्यात यश आले, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, बँकेचे संचालक महेंद्र लाड, तानाजी पाटील, बी. एस. पाटील, मन्सूर खतीब, बाळासाहेब होनमोरे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष नाईक म्हणाले, बँकेचे शतकमहोत्सवी वर्ष 28 मार्च 2026 पासून सुरू झाले आहे. त्या वर्षात 10 हजार कोटींच्या ठेवींचा संकल्प करण्यात आला होता, तो पूर्ण झाला असून 10 हजार 12 कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. बँकेच्या पारदर्शी कारभारावर विश्वास ठेवून ठेवी मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण, महिला बचत गटांना ताकद देण्याचे धोरण बँकेकडून केले जात आहे. सरकारच्या कर्जमाफी धोरणाचा फटका बसला. अन्यथा आणखी नफा वाढला असता. गतवर्षीपेक्षा नफा अधिक अपेक्षित होता. त्यानुसार विक्रमी 208 कोटी 88 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. चार वर्षांत बँकेच्या नफ्यात 78.36 कोटींनी वाढ झाली.
ते म्हणाले, चार वर्षांपूर्वी बँकेत अध्यक्ष झाल्यावर 7.81 टक्के नेट एनपीए होता. पाच वर्षांत शून्य टक्केचे उद्दिष्ट होते, ते चार वर्षांतच पूर्ण केले. ग्रॉस एनपीए 7.53 टक्केवरून सध्या 7.03 टक्केवर आला आहे. खेळते भांडवल 13 हजार 126 कोटी असून त्यामध्ये 3 हजार 959 कोटी रुपयांची वाढ झाली. चार वर्षांत भागभांडवल 37.56 कोटींनी वाढून 199 कोटी झाले. चार वर्षांत कर्जामध्ये 2900 कोटी वाढ हाऊन सध्या 7955 कोटी कर्जवाटप आहे. सध्याची गुंतवणूक 3 हजार 535 कोटी, तर निधी 398 कोटी आहे. सध्याची एनपीए रक्कम 559 कोटी आहे.