

आटपाडी : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाज सोमवारी रस्त्यावर उतरला होता. भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सूचनांनूसार आंदोलन झाले. नानाविध प्रकारे आंदोलन करून या समाजाने भाजप सरकारवरील राग व्यक्त केला. सांगलीत ढोल वाजवत आक्रोश मोर्चा काढला. 'येळकोट येळकोट, जय मल्हार!' चा नारा घुमला. पलूसमध्ये मेंढ्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात आला. आष्ट्यात अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आटपाडीत गजी-ढोलाच्या गजरात तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. आंदोनाचा वृत्तांत...
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काढण्यात येत असलेल्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज आटपाडीत धनगर समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक धनगरी गजी-ढोलाच्या गजरात निघालेल्या या मोर्चात तालुक्यातील हजारो समाजबांधव सहभागी झाले. मोर्चानंतर तहसीलदार शीतल बंडगर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब मोटे, जयवंत सरगर, रमेश कातुरे, महादेव पाटील, विष्णू अर्जुन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या मागण्या केवळ निवेदनापुरत्या मर्यादित न राहता शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. धनगर समाजाच्या या प्रश्नांकडे शासनाने आता केवळ आश्वासनांच्या चौकटीत न पाहता ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मोर्चातून व्यक्त झाली. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे आटपाडीत या आंदोलनाची जोरदार दखल घेतली गेली. शासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धनगर समाजाच्या मागण्या अशा
याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रतिकूल ठरल्यास आरक्षणाची अंमलबजावणी पर्यायी पद्धतीने कशी करता येईल, यासाठी शासनाने आतापासूनच ठोस 'प्लॅन-बी' तयार ठेवावा. केंद्र व राज्य शासनाने समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून निश्चित कालमर्यादेत अंतिम निर्णय घ्यावा. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकला 'हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर' यांचे नाव द्यावे, बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारांची चौकशी पूर्ण करा, याशिवाय श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थानासाठी स्वतंत्र, सक्षम व पारदर्शक देवस्थान कायदा करावा अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.