Sangli Crime : धामणीत महामार्गावर गोळीबाराचा थरार

गावठी पिस्तूलची चाचणी घेताना दोन राऊंड फायर; खासगी ठेकेदार गंभीर जखमी; दोघांना अटक, एक पसार
Sangli Crime News
धामणीत महामार्गावर गोळीबाराचा थरार
Published on
Updated on

सांगली : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धामणी (ता. मिरज) येथे गोळीबाराची घटना घडली आहे. गावठी पिस्तूलची चाचणी घेताना हा प्रकार घडला. यावेळी पोटात दोन गोळ्या लागल्याने खासगी ठेकेदार आदित्य कुमार नाईक हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धामणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पिस्तूल तस्कर समर्थ गायकवाड आणि पिस्तूल खरेदीसाठी गेलेला शिवतेज सावंत या दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक संशयित सुजल भोसले हा फरार झाला आहे.

सांगलीतील खासगी ठेकेदार आदित्य नाईक हा गावठी पिस्तूल खरेदी करणार होता. दरम्यान, मिरजेतील सराईत गुन्हेगार समर्थ गायकवाड हा गावठी पिस्तूलची तस्करी करीत असल्याची माहिती आदित्य नाईक याला मिळाली होती. त्यानुसार आदित्य नाईक याने समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. गावठी पिस्तूल खरेदीसाठी आदित्य नाईक हा शिवतेज सावंत याच्यासमवेत मोटारीतून, तर पिस्तूल तस्कर समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले हे दोघे दुचाकीवरून धामणी येथे राष्ट्रीय महामार्गावर गेले होते.

महामार्गावर एका ठिकाणी थांबून चौघेही आदित्य नाईक याच्या मोटारीमध्ये बसले. यावेळी त्यांच्यात पिस्तूल खरेदीबाबत व्यवहार सुरू होता. यावेळी गावठी पिस्तूल चालू स्थितीत असल्याचे दाखविण्यास सांगण्यात आले. आधीपासूनच लोड असणाऱ्या ता पिस्तूलची चाचणी घेत असताना समर्थ गायकवाड याच्याकडून दोन राऊंड फायर झाले. चौघेही मोटारीमध्ये असल्याने समर्थ गायकवाड याने झाडलेले दोन राऊंड थेट आदित्य नाईक याच्या पोटात लागले. आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून समर्थ गायकवाड व त्याचा साथीदार सुजल भोसले यांनी पिस्तूल घटनास्थळीच टाकून पलायन केले, तर शिवतेज सावंत याने जखमी आदित्य याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरवनाथ तळेकर यांनी पथके रवाना केली. समर्थ गायकवाड याला कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथून अटक करण्यात आली. पिस्तूल खरेदीसाठी आदित्य नाईक याच्यासोबत गेलेला शिवतेज सावंत याला सांगलीत काँग्रेस कमिटीजवळून अटक करण्यात आली, तर समर्थ गायकवाड याचा साथीदार सुजल भोसले हा फरार आहे.

दीड लाखाला ठरला होता व्यवहार

समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून तो आदित्य नाईक याला दीड लाख रुपयांना पिस्तूल विकणार होता. हे पिस्तूल समर्थ गायकवाड याने इंदौर येथून तस्करीसाठी मिरजेत आणल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, समर्थ गायकवाड याने यापूर्वी अन्य कोणाला गावठी पिस्तूलची विक्री केली आहे का? याचादेखील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news