Chandrakant Patil | सांगलीचा विकास, सुरक्षित शहरासाठी भाजपचा रोडमॅप तयार : चंद्रकांत पाटील

महानगरपालिकेची सत्ता पुन्हा भाजपकडे आल्यास तिन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला
Chandrakant Patil |
Chandrakant Patil Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांचा विकास आणि सुरक्षित शहर यासाठी भाजपचा रोडमॅप तयार आहे. महापालिका क्षेत्रातील रस्ते, रिंग रोड, राष्ट्रीय महामार्गांशी महापालिका क्षेत्राची कनेक्टीव्हिटी, कवलापूर विमानतळ, शहरांतील उड्डाण पूल, वारणा उद्भव पाणी योजना, आयटी पार्क, सक्षम आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण तसेच सुरक्षित शहर याबाबत भाजपचा रोडमॅप तयार आहे. महानगरपालिकेची सत्ता पुन्हा भाजपकडे आल्यास तिन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली महानगरपालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत भाजपने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडली होती की, भाजपला सत्ता द्या, आम्ही विकास करून दाखवू. त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता आली आणि लगेचच विशेष निधी म्हणून 100 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले. या निधीतून शहरातील अनेक प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. रस्ते, नागरी सुविधा आणि पायाभूत विकासाच्या कामांना चालना मिळाली. केंद्र, राज्य शासन, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध केला.

घनकचरा... प्रश्न सोडवला

ते म्हणाले, महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन हा अनेक वर्षांचा जटिल प्रश्न भाजपच्या काळात सुटला. रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर रोजच्या रोज प्रकिया केली जात आहे. कचरा ही आता दायित्व न राहता संपत्ती बनली आहे. कचऱ्यापासून खत, गॅस निर्मिती यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.

सांगलीला पुरापासून वाचवणार

जागतिक बँक पुरस्कृत एमआरडीपी प्रकल्पांतर्गत 600 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पुराचे पाणी शहरात शिरू नये, तसेच पावसाचे साचणारे पाणी तत्काळ गटारांद्वारे मोठ्या नाल्यांमधून शहराबाहेर काढले जावे, यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे, असे पाटील म्हणाले.

विमानतळाचे काम सहा महिन्यांत सुरू करू

सांगली शहर परिसर, जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने कवलापूर विमानतळाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासंदर्भात मी मंत्रालयात तीन बैठका घेतल्या. आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून विमानतळासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. विमानतळासाठी 200 एकर अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे.

शहरात तीन कायमस्वरूपी हेलिपॅड; शेरीनाल्यासाठी तरतूद

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस कृषी विभागाची जागा आहे. या जागेत कायमस्वरुपी तीन हेलिपॅड उभारली जाणार आहेत. शेरीनाला प्रकल्पासाठी मार्च महिन्याआधी निधीची तरतूद होईल.

बचत गटांसाठी 10 कोटींचा मॉल

महापालिका क्षेत्रातील रस्ते अधिक दर्जेदार करणे, रिंग रोड तयार करणे, आयटी पार्क उभारणे, वारणा उद्भव पाणी योजना राबवणे, तसेच शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा मजबूत करणे, हा भाजपचा पुढील अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला बचत गटांच्या उत्पादित मालांच्या विक्रीसाठी 10 कोटी रुपयांचा मॉल उभारण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणा सक्षम करणार

राज्य सरकारच्या निधीसोबत सीएसआर निधीची जोड देऊन महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल. सांगलीची लोकसंख्या पुण्यासारखी वेगाने वाढत नसली तरी, वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे उड्डाण पुलांची आवश्यकता आहे. सुरक्षित सांगलीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व एआय आधारित मॉनिटरिंग प्रणाली राबवून कायदा व सुव्यवस्था मजबूत केली जाईल, असे पाटील म्हणाले.

20 वर्षांचा हिशेब द्या

पाटील म्हणाले, महापालिकेची स्थापना 1998 मध्ये झाली. तेव्हापासून महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीची सत्ता येथे आली. महापालिकेपूर्वीच्या नगरपालिकेतही काँग्रेसचीच सत्ता होती. मात्र या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दीर्घकालीन काम का झाले नाही, शहराच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच का राहिल्या, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news