

उद्धव पाटील
सांगली : विकासाच्या शर्यतीत सांगली जिल्हा हा शेजारील कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांच्या मागे पडला आहे. सांगलीला कृषी, शिक्षण, सहकार आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. या जिल्ह्याची क्षमता अमर्याद आहे. तरीही सरकारकडून सांगलीला पोरकेपणाची वागणूक मिळत आहे. ती कधी थांबणार आणि विकास कधी गती घेणार? सांगलीच्याच विकासाची झोळी रिकामी का? असा प्रश्न पडतो आहे.
विकासाच्या घोषणा करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप कोणीच मागे राहिलेले नाही. काही घोषणा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वजनदार नेत्यांनी केल्या आहेत. मोठ्या सभांमधून, बॅनर-फ्लेक्सवरून, पक्षांच्या जाहीर मंचावरून सांगलीकरांना ‘विकासाचे नवे युग’ दाखवले गेले. पण वास्तवात अजूनही या सर्व योजना केवळ ‘घोषणाच’ ठरल्या आहेत. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी जलसिंचन योजनांमुळे सांगली जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र वेगाने वाढले असून शेती उत्पादनात मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगांव्यतिरिक्त अन्य शेतीमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी ही गरज आहे. फळे, भाजीपाला, डाळी, मसाले यांसारख्या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण झाले, तर शेतकर्यांना हमखास बाजारपेठ मिळेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. यासोबतच ड्रायपोर्ट, निर्यात केंद्र व विमानतळाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्हा शेतीमाल निर्यातीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो.
सांगली जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे, तर नशेखोरीचे प्रमाणही चिंताजनक स्तरावर गेले आहे. निवडणुकांपूर्वी मोठे प्रकल्प आणून बेरोजगारी संपवण्याच्या घोषणांचा डंका पिटला जातो. प्रत्यक्षात एकही मोठा उद्योग जिल्ह्यात उभारला गेलेला नाही. परिणामी उच्चशिक्षित तरुण-तरुणींना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या शहरांकडे जावे लागते. एकेकाळी सांगली जिल्हा सत्तेत महत्त्वाच्या पदांवर होता. वजनदार पदे सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडे होती. जलसिंचन योजना, साखर कारखाने यांचा अपवाद वगळता सांगली जिल्हा विकासात पाठीमागेच राहिला. खरं तर जलसिंचन योजनांनाही खूप विलंब झाला. सांगली जिल्ह्यातील अनेक नेते जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी भाजपमध्ये दाखल झाले. पण सांगली जिल्हा अजूनही घोषणांच्या गर्तेतच अडकला आहे. नेत्यांना सत्ता, पदे आणि राजकीय स्थैर्य मिळाले; मात्र सांगलीच्या झोळीत पोकळ स्वप्नांचाच ढिगारा पडला.
सांगलीत जाहीर झालेले विमानतळ अजून कागदावरच का आहे?
रांजणीत ड्रायपोर्ट, सलगरेत मल्टिलॉजिस्टिक पार्कची केवळ घोषणा
होती काय?
आयटी पार्क उभारण्याची घोषणा नेमक्या कोणत्या टप्प्यात आहे?
कृषी विद्यापीठ, हळद संशोधन केंद्राची गाडी अडली कुठे?
पशुवैद्यकीय कॉलेज होता होता का थांबले?
मोठे उद्योग उभारण्याच्या घोषणा हवेतून वास्तवात कधी येणार?
हळद संशोधन केंद्र, द्राक्षे, डाळिंब निर्यात केंद्र कुठे आहे?
स्वतंत्र सांगली तालुका, आष्टा तालुका, जतचे दोन तालुके यासाठी अजून
किती काळ लागणार?
कृषी विद्यापीठ कधी मिळणार?
पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काय झाले?
मोनोरेलमधून सांगलीकर कधी प्रवास करणार?