

इस्लामपूर : वाकुर्डे योजनेच्या श्रेयवादावरून झालेल्या भांडणातून रेठरेधरण (ता. वाळवा) येथील उपसरपंच मदन पाटील यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी व आईस मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या मारहाणीत उपसरपंचाची पत्नी कोमल मदन पाटील (वय 43) व आई सावित्री शिवाजी पाटील (75) या जखमी झाल्या आहेत. जखमी कोमल यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयितांनी घरातील साहित्याची मोडतोड करत गाड्यांचे नुकसान केले. विकास विलास पाटील, सुहास गुणवंत पाटील, तानाजी मारुती पाटील, बाजीराव मारुती पाटील, विनायक विलास पाटील, सर्जेराव वसंत पाटील, सचिन शिवाजी पाटील, शंभू विकास पाटील, सुयोग अशोक पाटील, पिन्या लोहार, सुयोग मोहिते, दाद्या पवार, स्वप्निल सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाकुर्डे योजनेचे पाणी गावामध्ये आणण्याच्या श्रेयवादावरून रेठरेधरण ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी व विरोधकांत वाद झाला होता. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उपसरपंच मदन पाटील यांचा मुलगा ओंकार शेतातून परत येत होता. यावेळी विकास पाटील हा बसस्थानकासमोर आला. त्याने ओंकारला ‘काय बघतोस माझ्याकडे, तुला लय मस्ती आली आहे’, असे म्हटले व निघून गेला. याचा जाब विचारण्यासाठी मदन व ओंकार हे विकास याच्याकडे गेले. त्यावेळी दोघांना मारहाण करण्यात आली.
त्यानंतर सकाळी 9.30 च्या सुमारास कोमल, सावित्री या दोघी घरात होत्या. त्यावेळी संशयित विकास, सुहास, तानाजी, बाजीराव, विनायक, सर्जेराव, सचिन आदी काठ्या, गज, दगड घेऊन उपसरपंच मदन पाटील यांच्या घरात घुसले. त्यांनी कोमल यांना दगड मारला. सावित्री यांना ढकलून दिले. कोमल यांना मारहाण केली. ‘तुझा नवरा व मुलगा कोठे आहेत? कुठे त्यांना लपवले आहे? त्यांचा आज शेवटच करतो, असे म्हणून संशयितांनी त्यांचा घरामध्ये शोध घेतला. घरातील साहित्य विस्कटले. दुकानाजवळ लावलेल्या दुचाकीवर दगड, काठ्या मारून नुकसान केले.